भोपाळ : मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात मंगळवारी बसला अपघात झाला होता, बसमध्ये 54 प्रवासी होते. यातील बहुतांश विद्यार्थी होते, ते रेल्वेची परीक्षा देण्यासाठी जात होते. मात्र, ही परीक्षा देण्यापूर्वीच आयुष्याचा पेपर संपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सकाळची वेळ असल्याने प्रवासी झोपेत होते. त्यामुळे त्यांना हालचाल करता आली नाही. आतापर्यंत 50 प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेणं सुरु आहे.
मध्य प्रदेशात मंगळवारी एक बस कालव्यात कोसळून अपघात झाला होता. या अपघातात बसमधील 50 प्रवाशांचा कालव्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यापैकी बहुतांश जण विद्यार्थी होते. हे विद्यार्थी रेल्वेची परीक्षा देण्यासाठी जात होते. मात्र, ही परीक्षा देण्यापूर्वीच या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पेपर संपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ही बस मंगळवारी सकाळी सतानच्या दिशेने जात होती. तेव्हा चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस कालव्यात जाऊन कोसळली. बस खोल कालव्यात पडल्यानंतर बुडायला लागली. तेव्हा सात प्रवाशांनी बसच्या बाहेर पडण्यात यश मिळवलं. हे प्रवासी पोहत कालव्याच्या बाहेर पडले. मात्र, इतर प्रवासी बसमध्येच अडकून पडल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या भरपाईची घोषणा केली आहे.
या बसमधील लोक सकाळची वेळ असल्याने झोपेत होते. त्यामुळे बस पाण्यात पडल्यानंतर या लोकांना झटपट हालचाल करता आली नाही. कालव्यातील पाण्याचा प्रवाहदेखील जोरदार होता. त्यामुळे प्रवाशांना स्वत:चा जीव वाचवायची संधी मिळाली नाही. एरवी रीवा आणि सतानला जाणाऱ्या या बसमध्ये फारशी गर्दी नसते. मात्र, परीक्षा असल्यामुळे बसमध्ये विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. तसेच सतानला जाताना ही बस छुहिया घाटातून जाते. मात्र, मंगळवारी ही बस नेमकी कालव्याच्या मार्गाने गेली. ही बस अत्यंत वेगात होती. रस्त्यावरील एक गतीरोधक पार करताना बसचे संतूलन बिघडले आणि ती कालव्यात जाऊन कोसळली. त्यावेळी कालव्यात बरेच पाणी असल्याने बस लगेच बुडाली. यामध्ये 50 प्रवाशांचा करुण अंत झाला.