मुंबई : नागपूरसह विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काल मंगळवारी रात्री झालेल्या पावसानंतर आज बुधवारी सकाळपासून वातावरणात पुन्हा गारवा जाणवत आहे. विदर्भात आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे फळबागांना नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यासह इतर भागाला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावरती चक्रीय चक्रवाताचा प्रभाव तयार झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आस्मानी संकट असणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 17 आणि 18 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस तर 19 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनीही आपल्या मालाची काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
* वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
दरम्यान, आज मध्यरात्रीपासूनच वर्धा जिल्ह्याच्या काही भागात मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या वर्धा, देवळी, हिंगणघाट, सेलू तालुक्यासह कारंजा तालुक्याच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर मध्यरात्री बरसल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
* गारपिटीची शक्यता, शेतकऱ्यांना बसणार फटका
मध्यरात्री काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह पाऊस झाल्याने काही वेळ ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता. अचानक आलेल्या या पावसाने चना पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने मंगळवारी इशारा देत बुधवारी म्हणजेच आज पूर्ण विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
* कोणत्या भागांमध्ये कधी पाऊस?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 17 तारखेला विदर्भासह, मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे. या भागांमध्ये गारपिटीची शक्यता देखील अधिक राहणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या दिवशी औरंगाबाद, खानदेश आणि पश्चिम-महाराष्ट्रात मात्र वादळी पावसाची फार शक्यता नसणार.
18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.