चंदीगड : पंजाबमध्ये भाजपला धक्का बसला आहे. स्थानिक संस्था निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. मतमोजणी अद्यापही सुरु असून आतापर्यंत ७ पैकी ६ महापालिकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट आणि बठिंडा महापालिकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. दरम्यान, बठिंडा पालिकेत ५३ वर्षांनी काँग्रेसला पुन्हा विजय मिळाला आहे.
कृषी कायद्याच्या विरोधात चालू असणाऱ्या आंदोलनामुळे पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला जोरदार दणका बसला आहे. अनेक जिल्ह्यातील महत्वाच्या जागांवर काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाने वर्चस्व मिळवले आहे. तसेच महत्वाच्या सातपैकी सहा महानगरपालिकांवर काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. यात सर्वात धक्कादायक असलेला निकाल म्हणजे भाजप खासदार सनी देओल याच्या मतदारसंघातील सर्वच्या सर्व २९ जागांवरील भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
कृषी कायद्याच्या विरोधात सनी देओल याने कोणतीच स्पष्ट भूमिका घेतली नसल्यामुळेच हा फटका बसल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. लाल किल्ला येथील घडलेल्या घटनेतील मुख्य आरोपी असणारा दीप सिद्धू हा याच मतदारसंघातील असल्यामुळे हा पराभव महत्वाचा मानला जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशात कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरु आहे. यात पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. या आंदोलनातून केंद्र सरकार व पर्यायाने भाजप विरोधात शेतकऱ्यांचा मोठा रोष निर्माण झाला आहे. यामुळेच पंजाब मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस व शिरोमणी अकाली दलाने अनेक जागांवर विजय मिळवला आहे.
विशेष म्हणजे भाजप खासदार सनी देओल यांच्या गुरदासपूर या लोकसभा मतदारसंघातील सर्वांच्या सर्व २९ जागांवर भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे. सनी देओलने शेतकरी आंदोलनासंदर्भात कोणतीच स्पष्ट भूमिका घेतली नसल्यामुळेच त्याच्या मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाल्याचे बोलले जात आहे.
कृषी कायद्याच्या विरोधात केंद्रात व राज्यात असणारी भाजप व अकाली दल यांची युती तुटली होती. ही युती तुटल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच भाजपला निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकूणच शेतकऱ्यांनी आपला विरोध मतदान यंत्रातूनच दाखवून दिला आहे, असेच म्हटले जात आहे.