सोलापूर : माघी एकादशीचा मुख्य सोहळा 23 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी अखेरपर्यंत लॉकडाऊन आहे. यामुळे पंढरीत माघ यात्रेला भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून 22 रोजी रात्री 12 ते 23 रोजी रात्री 12 पर्यंत पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर दिंड्या, पालख्यांना पंढरपूर प्रवेशही बंद केला आहे. काल शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांनी यात्रेविषयी सविस्तर आदेश काढले आहेत.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन (माघ वारी) दरवर्षीला 3 ते 4 लाख भाविक येतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी दशमी रोजी रात्री बारापासून ते माघी एकादशी रोजी रात्री बारा या 24 तासांमध्ये पंढरपूर शहर आणि लगतच्या दहा गावांत संचारबंदी लागू राहणार आहे. या काळात प्रवासी वाहतूक नियंत्रित राहणार आहे; परंतु पंढरपूरला येणाऱ्या पायी दिंड्यांना मात्र प्रतिबंध करण्यात आला आहे.
माघी एकादशीचा सोहळा 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यात्रेपूर्वीच गेल्या चार दिवसांपासून शहरात भाविकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे एकादशीच्या वेळी संचारबंदी राहणार किंवा नाही, याविषयी भाविक, स्थानिक नागरिक आणि विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता.
माघी यात्रेसाठी सुमारे तीन ते चार लाख भाविक येत असतात. गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता म्हणून 22 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते 23 फेब्रुवारी रोजी रात्री बारापर्यंत या चोवीस तासांत पंढरपूर शहरात तसेच भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी या शहरांलगतच्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय साथ नियंत्रण अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार संचारबंदी आदेश लागू केले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माघ शुद्ध दशमी (ता. 22) आणि माघ शुद्ध एकादशी (ता. 23) असे दोन दिवस भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात यावे, तथापि “श्रीं’चे परंपरेनुसार चालत असलेले सर्व नित्योपचार मंदिर समितीमार्फत केले जातील. माघी एकादशी (ता. 23) रोजी होणाऱ्या श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सहअध्यक्ष, सदस्य यांच्या हस्ते सपत्निक करण्यात येते. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे एक सदस्य यांच्या हस्ते सपत्निक (दोन अधिक तीन एकूण पाच) व श्री रुक्मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीचे एक सदस्य यांच्या हस्ते सपत्निक (दोन अधिक तीन एकूण पाच) यांना करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
प्रवासी वाहतूक सेवा नियंत्रित माघी वारीला बहुसंख्य वारकरी हे रेल्वे, एसटी बस व खासगी वाहनांमधून येत असतात. माघ शुद्ध दशमी (ता. 22) व माघ शुद्ध एकादशी (ता. 23) या काळात ही वाहतूक सेवा व इतर सेवा पूर्णपणे बंद न करता नियंत्रित ठेवावी; जेणेकरून सर्वसामान्य प्रवासी, वैद्यकीय सेवा व इतर सेवा चालू राहतील. मंदिर परिसरापासून दूर अंतरावर सर्वसामान्य प्रवासी उतरेल. याबाबत आवश्यक ते नियोजन पोलिस विभाग, परिवहन विभाग आणि एसटी महामंडळ हे करणार आहेत.
माघी यात्रेसाठी राज्यभरातून 250 पेक्षा जास्त पायी दिंड्या पंढरपूरला येत असतात. या दिंड्या मराठवाडा, कोकण, विदर्भ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणांहून येतात. कोरोना विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर या पायी दिंड्यांना पंढरपूरच्या दिशेने प्रस्थानास बंदी करण्यात आली आहे.
* मठामध्ये नव्याने येणाऱ्या लोकांना बंदी
पंढरपूर शहर व परिसरामध्ये जवळपास 1200 मठ असून यात्रेपूर्वी काही दिवस अगोदर या मठांमध्ये बाहेरगावाहून वारकरी वास्तव्यास येण्याची शक्यता आहे. तसेच 65 एकर परिसर, चंद्रभागा नदी पात्र या ठिकाणीही वारकरी वास्तव्यास येत असतात. स्थानिक नगरपरिषदेकडून वारी संपेपर्यत मठांची दररोज तपासणी केली जाणार आहे. मठामध्ये नव्याने येणाऱ्या लोकांना बंदी करण्याबाबतच्या उपाययोजना उपविभागीय अधिकारी पंढरपूर व मंदिर समिती हे करतील. पोलिस विभागामार्फत मठ प्रमुखांच्या बैठका घेऊन त्यांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटिसा बजावतील.
* उत्सवाचा काला आणि चक्रीभजन
ह.भ.प. औसेकर महाराज यांचे चक्रीभजन
माघ शुद्ध त्रयोदशी (ता. 25) रोजी ह.भ.प. औसेकर महाराज यांना एक अधिक अकरा मानकरी यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल मंदिर सभामंडपात योग्य ती खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने चक्रीभजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
श्री पुंडलिकराय उत्सवाचा काला माघ शुद्ध त्रयोदशी (ता. 25) रोजी श्री पुंडलिकराय उत्सवाचा काला या कार्यक्रमास एक अधिक पंचवीस वारकऱ्यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. हा काला त्या दिवशी सकाळी दहा ते बारा या वेळेत पार पडणार आहे.