सोलापूर : श्री विठुरायाचे मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने मंदिराकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते खासगी वाहनांना बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वयोवृद्ध भाविकांना प्रदक्षिणा मार्गावरून मंदिरापर्यंत चालत जावे लागत होते. ज्येष्ठ वारकरी व दिव्यांग भाविकांची ही गैरसोय लक्षात घेऊन अॅड. माधवी निगडे व ‘वेणू सोपान वेल्फेअर फाउंडेशन’ने हा मार्ग सुखकर करण्यासाठी ‘ई-रिक्षा’ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 10 लाख रुपये किमतीच्या दोन रिक्षा या दोन दानशूर भक्तांनी मंदिर समितीला देणगी स्वरूपात दिल्या आहेत.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वृद्ध, दिव्यांगांसाठी आता ई-रिक्षेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अॅड. माधवी निगडे वेलफेअर फाऊंडेशन व वेणू सोपान वेलफेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 10 लाख रुपये किंमतीच्या दोन प्रदूषणविरहित ई-रिक्षा मंदिर समितीला देऊ केल्या आहेत. यामुळे आता भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी चौफळा ते मंदिर व महाद्वारापासून मंदिरापर्यंत ई-रिक्षा प्रवास करता येणार आहे.
या रिक्षात चार्जिंग बॅटरीचा वापर करण्यात आला असल्याने प्रदूषण होणार नाही. रिक्षात आसन व्यवस्था आरामशीर करण्यात आली असून एका रिक्षात 8 भाविक बसून प्रवास करू शकतात. या रिक्षा फक्त चौफळा ते मंदिर व महाद्वार गेट ते मंदिर यादरम्यानच धावणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दक्षिण काशी पंढरीत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक येतात. पंधरवडा एकादशीला व वर्षातील चार महत्त्वाच्या यात्रांना लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यामध्ये अंध, अपंग, आजारी भाविकदेखील असतात. या भाविकांना मंदिरात जाताना चालत जावे लागत होते.
खासगी वाहने, रिक्षा मंदिराकडे जात नसल्याने भाविकांची अडचण होत होती. याबाबत भाविकांनी मंदिर समितीकडे या भाविकांना ये-जा करण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेत मंदिर समितीच्या सदस्य अॅड. माधवी निगडे यांनी अॅड. माधवी निगडे वेलफेअर फाऊंडेशन व वेणू सोपान वेलफेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चार्जिंगवर चालणार्या दोन ई-रिक्षा मोफत देऊ केल्या आहेत. याचा लोकार्पण सोहळा 21 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे अॅड.निगडे यांनी सांगितले.
चौफाळा आणि महाद्वार पोलीस चौकी या दोन ठिकाणांहून जाणाऱ्या भाविकांना या ई-रिक्षाचा मोफत लाभ घेता येणार आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या रिक्षाची किंमत पाच लाख रुपये आहे. या रिक्षाची देखभाल-दुरुस्ती हे दोन दानशूर भाविक कायमस्वरूपी करणार आहेत.