बार्शी : किरकोळ कारणावरुन युवकाचा खून केल्याचा गुन्हा शाबित झाल्याने सत्र न्यायालयाने गणेश सोनबा धोत्रे, दीपक सुनील धोत्रे यांना जन्मठेपेची व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलीय.
विकास अनिल धोत्रे (वय 22) याचा या दोघांनी डोक्यात दगड घालून आणि गळ्यावर चाकूचे वार करुन खून केला होता. मयत व आरोपी माढा तालुक्यातील मोडनिंब येथील रहिवाशी होते. याप्रकरणी सरकारपक्षाच्यावतीने ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी अमृत खेडेकर यांनी सहाय्य केले.
15 सप्टेंबर 2017 रोजी दुपारी 12 वाजता मोडनिंब गावातील श्रीपाद माऊली मठात विकास धोत्रे हा बसला होता. यावेळी आरोपी तेथे गेले आणि त्यांच्यात डुकराचे पिल्लू मारण्यावरुन यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरुन गणेश धोत्रे याने विकासच्या डोक्यात दगड घातला तर दिपक धोत्रे याने चाकूने गळा कापला. अतिरक्तस्त्रावाने विकास हा जागेवरच मयत झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रकरणी त्याचा भाऊ विनोद धोत्रे याने दिलेल्या फिर्यादीवरुन टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंद खोबरे यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले.
अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश अजित भस्मे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्यावतीने 11 साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी शवविच्छेदन अहवालात नमूद जखमा आणि साक्षीदारांनी सांगितलेल्या जखमांमध्ये सुसंगती आढळली. अरोपीनी घटनेवेळी घातलेल्या कपड्यावरील रक्ताचे डाग अहवालात जुळले. मयताच्या अंगावरील जखमा या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्राने झाल्याचा दुजोरा वैद्यकीय अधिकार्यांनी दिला. आरोपींनी केलेला गुन्हा शाबित झाला आहे, असा युक्तीवाद ऍड. दिनेश देशमुख यांनी केला तो ग्राह्य मानून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.