मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळली आहे. यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ शस्त्रसाठा सापडला.
मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथके घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचे समजते.
कंबाला हिल भागात मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे बहुमजली निवासस्थान असून या इमारतीच्या जवळच्याच रस्त्यावर आज सायंकाळी एक हिरव्या रंगाची कार बेवारस स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. बॉम्ब स्क्वाडने कारची तपासणी केली असता त्यात जिलेटिनच्या कांड्या व अन्य स्फोटके आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. ही स्कॉर्पिओ कार असून कारचा नंबर खोडण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कारमध्ये एक पत्रही सापडल्याची माहिती मिळाली आहे. या कारबाबत सर्वप्रथम अँटिलियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली व पुढील अनर्थ टळला.
स्फोटके निकामी करण्यात आली असून धोका टळला आहे. सदर रस्त्यावरील रहदारी थांबवण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे घटनास्थळी दाखल झाले असून सर्व स्थितीवर ते नियंत्रण ठेवून आहेत. दरम्यान, ही कार नेमकी कुणाची आहे?, ही कार अँटिलियाजवळ कुणी पार्क केली?, यामागे नेमका हेतु काय होता, याचा उलगडा पोलिसांच्या तपासात होणार आहे.
* तात्काळ मिडियासमोर आले गृहमंत्री
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळली आहे. कार आढळल्याचे समोर येताच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे तात्काळ मिडियासमोर आले. ‘मला या प्रकरणाची माहिती आताच मिळाली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास गुन्हे शाखा करत आहे’, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
* ‘मुकेश अंबानी यांनी घाबरण्याचे कारण नाही, गरज पडल्यास सुरक्षा वाढवू’
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळली. यानंतर प्रतिक्रिया देतांना राज्याचे गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले की, ‘गरज पडली तर अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल. वाहन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. स्फोटके का ठेवली यांच्या मूळाशी आम्ही जाऊच. पण तपास सुरु असल्याने सध्यातरी भाष्य करणे चुकीचे आहे. मुकेश अंबानी यांनी घाबरण्याचे कारण नाही’.