मुंबई : एका शिवसेनेच्या खासदारावर विविध आरोप करून, ‘ते माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ अशी तक्रार करणारा अर्ज काल शुक्रवारी एका उच्चशिक्षित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. त्यामध्ये, आपल्या मागे माणसे लावणे, हेरगिरी करणे, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखविणे यासारख्या आरोपांसह विनयभंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने चार मार्चला पुढील सुनावणीचे आदेश दिले आहेत.
ॲड. आभा सिंग यांनी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज दाखल केला. ‘सन २०१३मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी माहिम पोलिस ठाण्यात आणि सन २०१८ मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता; मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही.
आरोप असलेल्या खासदाराचे नाव संजय राऊत आहे. पोलिसांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही,’ असे या महिलेने याचिकेत म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवून दाद नाही
सात वर्षांपासून सुरू असलेल्या या छळवणुकीविषयी गेल्या वर्षी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दाद मागितली. मात्र, काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. अखेर आयोगाने एफआयआर नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, तरीही बीकेसी-परिमंडळ ८ च्या पोलिस उपायुक्तांनी त्याची आजतागायत दखल घेतली नाही. म्हणून नाईलाजास्तव उच्च न्यायालयात दाद मागावी लागत आहे,’ अशी कैफियतही या महिलेने याचिकेत मांडली आहे.
या संदर्भात प्रतिक्रियेसाठी संजय राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.