मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येशी संबंधित वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्नावर अधिक आक्रमक झाल्या आहेत. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने राज्यभर चक्का जाम आंदोलन केलं.
संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा शिवाय त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. याच मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी मुलुंड टोलनाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं. महिलांच्या ठिय्यामुळे काही वेळासाठी रहदारीवर परिणाम देखील झाला होता.
वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याशिवाय शांत राहणार नाही असा इशाराच या महिला मोर्चाकडून देण्यात आला आहे. मुलुंड टोलनाक्याजवळ हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी पोहचून भाजपच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.
पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येस जबाबदार ठरवून पुण्यामध्ये भाजपच्या महिला आघाडीकडून कोथरुड पोलीस स्टेशनवर या मुद्द्यावरुन मोर्चा काढण्यात आला. तर बीडमध्ये संजय राठोड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वसई विरार मध्ये भाजप महिला मोर्चाकडून नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. मंत्री संजय राठोड यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा महाविकास आघाडी सरकारने राजीनामा कबूल करावा,नाहीतर या पेक्षा तीव्र आंदोलन करू,असा इशारा भाजप महिला कार्यकर्त्यांनी दिला आहे. असेच आंदोलन पुणे, परभणी, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणी झाले.
पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली.
त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
आत्महत्या करुन आज वीस दिवस झाले तरीही या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, त्यामुळे या तपासात अडचणी येत आहेत असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.