नवी दिल्ली : उद्यापासून देशभर कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. कोव्हिड योद्ध्यांनंतर आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. उद्या सोमवारपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली होती.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना लसीकरण करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना लसीची किंमत निश्चित केली आहे. सरकारने त्याची किंमत 250 रुपये निश्चित केली आहे. खासगी रुग्णालये कोरोनाच्या लसीच्या प्रत्येक डोसाठी 250 रुपये शुल्क आकारू शकतात. म्हणजे एकूण दोन डोससाठी 500 लागतील. 1 मार्चपासून देशात 60 वर्षांपेक्षा जास्त व 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांना लस देण्याची तयारी सुरु आहे.
सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 10 हजार सरकारी, तर 20 हजार खासगी केंद्रांवर कोरोना लस उपलब्ध असेल. 45 वर्षांवरील सहव्याधी (कोमॉर्बिडीटीज) असलेल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. ज्या व्यक्तींना सरकारी केंद्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कोव्हिड लस घ्यायची असेल, त्यांना लसीचे पैसे मोजावे लागतील.
कोरोना लसीसाठी जास्तीत जास्त फी 250 रुपये असेल. ज्यामध्ये लसीची किंमत 150 रुपये आणि 100 रुपये सेवा शुल्क असणार आहे. पुढील आदेश होईपर्यंत ही किंमत तशीच राहील. सूत्रांच्या माहितीनुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, ‘ऑन-साइट’ नोंदणीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. जेणेकरून पात्र लाभार्थी त्यांच्या आवडीच्या लसीकरण केंद्रात जाऊन त्यांची नोंदणी करुन लस घेतील. लसीचे लाभार्थी को-विन 2.0 पोर्टल डाउनलोड करून तसेच आरोग्य सेतूसारख्या मोबाइल अॅप्सद्वारे प्रथम नोंदणी करू शकतात.
आरोग्य मंत्रालयाने सांगितलं होते की, सर्व लाभार्थ्यांना स्वतःचे फोटो ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादीसह लसीकरण केंद्रात जावे लागेल. त्याच वेळी, 45 वर्षापेक्षा जास्त वयाचा लाभार्थी कोणत्याही रोगाने ग्रस्त असल्यास, रोगाशी संबंधित प्रमाणपत्र देखील आणावे लागेल. ज्यावर नोंदणीकृत डॉक्टरची सही गरजेची असेल.
लसीकरणासंदर्भात यावेळी सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जे नोंदणी करत नाहीत त्यांना लस मिळणार की नाही? ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त लोकांना ‘वॉक इन रजिस्ट्रेशन’ ची सुविधा देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना मोबाईल जास्त हाताळता येत नाही किंवा ऑनलाईन नोंदणी करता नाही, ते थेट रुग्णालयात जाऊन ही लस घेऊ शकतात. मात्र ऑनलाईन नोंदणी किंवा अॅपद्वारे नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल असं बोललं जात आहे.