वेळापूर : माळशिरस तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून यामध्ये अनेक गरीब लोकांच्या शासकीय जागा व घरे या मार्गात जात आहेत. त्यांना मोबदला ही मिळणार नाही. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या शेकडो कुटुंबांचा संसार उघड्यावर येणार आहे.
माळशिरस येथील पंचायत समितीमध्ये पालखी मार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकरी व इतर बाधित लोकांची बैठक माढा लोकसभेचे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रांताधिकारी शमा पवार, आ. रणजितसिह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, के के पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे सदस्य अजय सकट, प्रताप पाटील, हसीना शेख, जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, गणेश पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, अॅड. सोमनाथ वाघमोडे, राष्ट्रीय महामार्ग समितीचे अध्यक्ष शंकरराव काळे पाटील, बाळासाहेब सरगर , राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे यांची उपस्थिती होती.
यावेळी गावठाण बाधित संघर्ष समितीचे नेते आणि पं.स. सदस्य अजय सकट यांनी महत्वाचा मुद्दा मांडला. शासकीय जागेत असणाऱ्या घरे व घरकुले महामार्गात जात आहेत. धर्मपुरी ते दसुर या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील शेकडो गरीब, मागासवर्गीय समाजातील लोकांचे घरे उदध्वस्त होणार आहेत. सरकारने त्यांना कायमस्वरूपी जागा व घरे बांधून द्यावेत, त्यांची सोय करावी, अनेकांचा सर्वे झाला नाही, तो तात्काळ करण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, ठेकेदार यांची बैठक घेऊन मार्ग काढावा अन्यथा आम्ही घरे, जागा भूसंपादन करू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
“महामार्ग बाधित लोकांनी जर ठेकेदार व अधिकारी जबरदस्तीने घरे पाडून मोबदला अथवा कायमस्वरूपी जागा व घर देत नसतील, त्यासाठी मोठा लढा उभा करणार आहे. त्यामुळे अशा बाधित बांधवांनी संपर्क साधावा. कायमस्वरूपी पर्यायी जागा व घर बांधून द्यावेत, आपली आग्रही मागणी आहे”
अजय सकट – माळशिरस पंचायत समिती सदस्य