सोलापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरासाठी एक दिलासादायक बातमी आहे. सोलापूरचा मृत्यूदर 10 टक्क्यावरुन घटून आता 5.7 टक्क्यावर आला आहे. या विषयीची माहिती पालिका आयुक्त आणि जिल्हाधिका-यांनी दिली आहे. वेग मंदावला असला तरी मुंबईपेक्षा सोलापूर शहराचा मृत्यूदर अधिक असल्याचे समोर येत आहे. यासाठी प्रशासनाला आणखी परिश्रम घेण्याची गरज आणि नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.
राज्यातील इतर शहरांच्यामानाने सोलापूरचा कोरोना मृत्युदर सर्वाधिक होता. मात्र जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या प्रयत्नाला आता यश येताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी कोरोनाचा मृत्युदर 10 टक्क्यांवर गेला होता. आता कोरोनाचा मृत्युदर 5.7 टक्क्यांवर असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागांमध्ये रॅपिड अँटीजन चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर रुग्णावर उपचार करण्यासाठी सोयीस्कर होत आहे.
महानगरपालिकेच्या प्रतिबंधित क्षेत्रातील को -मोरबीड लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. यात पाच ते सात टक्क्यांपर्यंत कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सहज शक्य होत आहे. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने केलेल्या नियोजनामुळे 24 तासात मृत पावणाऱ्यांचे प्रमाण हे 20 टक्क्यावरून पाच टक्क्यांवर आल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे.
अलगीकरण केंद्रातील सुविधा वाढविण्यात येणार असून उद्यापासून अलीगकरण केंद्रातल्या लोकांना गरम पाणी मिळणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली आहे.
* भर पावसात शिबिरास भेट
आज शुक्रवारी भर पावसात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी शिवशंकर, महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज जावळे यांनी भागातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेवक गुरुशांत धुतुरंगावकर यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या रॅपिड एजंट एस शिबिराला भेट देऊन समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे भर पावसातसुद्धा नागरिकांनी या शिबिराला प्रतिसाद दिला. शंभराहून अधिक चाचण्या यावेळी घेण्यात आल्या. त्यामध्ये एकही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. सभागृहनेते श्रीनिवास करली, नगरसेवक शिवानंद पाटील, नगरसेविका अनिता कोंडी यांची उपस्थिती होती.
* सोलापूर शहराचा मृत्यूदर मुंबईपेक्षा अधिक
मुंबई शहरातील कोरोनाचा मृत्यूदर ५.६१ टक्के, पुण्याचा मृत्यूदर अडीच टक्के आहे. ठाणे शहराचा मृत्यूदर ३.३५ टक्के तर औरंगाबाद शहरातील मृत्यूदर ४.६३ टक्के आहे. एप्रिल आणि मे महिन्यात या शहरातील स्थिती चिंताजनक होती. परंतु, या शहरांमधील मृत्यूदर घटत असल्याचे दिसते. सोलापूर शहरातील मृत्यूदर २२ जुलै रोजी ८.२१ टक्के आहे. मुंबई हे दाट लोकवस्तीचे शहर मानले जाते. मुंबईपेक्षा सोलापुरातील वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय आहे.