चेन्नई : व्ही. के. शशिकला यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा त्यांनी केली. एमके स्टालिन यांचा पक्ष द्रमुक (DMK) सत्तेत येऊ नये याची काळजी घ्यावी, असे त्यांनी आवाहन केलं आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये 6 एप्रिलला विधानसभेच्या सर्व जागांवर मतदान होणार आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारानं जोर पकडण्यापूर्वीच राज्याच्या राजकारणात नवं वळण आलं आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जवळच्या आणि एआयडीएमके (AIADMK) पक्षाच्या नेत्या व्ही. शशिकला यांनी राजकारणातून संन्यास जाहीर केला आहे. शशिकला यांची काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटका झाली होती. त्यांनी अचानक सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतल्यानं तामिळनाडूत खळबळ उडाली आहे.
शशिकला यांनी ही घोषणा करताना AIADMK च्या कार्यकर्त्यांना डीएमके (DMK) पक्षाला हरवण्याचं आवाहन केलं आहे. ‘आपलं लक्ष्य हे आपला शत्रू डीएमकेला हरवणं हे आहे. मला कधीही सत्तेमध्ये रस नव्हता. मी माझ्या आणि अम्मांच्या समर्थकांची आभारी आहे,’ असं त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये म्हंटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तमिळनाडूच्या राजकारणातील दोन दिग्गज जयललिता आणि करुणानिधी यांच्या अनुपस्थितीमध्ये ही निवडणूक होत आहे. तमिळ अभिनेते कमल हसन देखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सत्तारुढ भाजपा -एआयडीएमके युतीला शशिकला यांच्या या घोषणेचा राजकीय लाभ मिळण्याची शक्यता आहे.
शशिकला या आगामी विधानसभा निवडणूक लढवतील असं त्यांचा भाचा दिनकरण यांनी सांगितले होते. दिनकरण यांनीही या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्क केलं आहे. ‘ मला हे थोड्या वेळापूर्वीच समजलं. चिन्नमा यांनी मला बोलावलं होतं. मी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा निर्धार पक्का होता. त्यांनी त्यांच मत पत्रातून व्यक्त केलं आहे,’ अशी प्रतिक्रिया दिनकरण यांनी दिली आहे.
* जयललिता यांची सावली म्हणून ओळख
माजी मुख्यमंत्री जयललिता यांची सावली म्हणून शशिकला यांची ओळख होती. शशिकला यांना 2017 सााली बेहिशेबी संपत्ती प्रकरणात चार वर्षांची शिक्षा झाली होती. ही शिक्षा पूर्ण करुन त्या नुकत्याच परतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या जेलमधून बाहेर आल्यानंतर तामिळनाडूचा राजकीय पारा वाढला होता. भाजपाच्या मध्यस्थीनं एआयडीएमके पक्षाच्या दोन्ही गटाचं विलिनीकरण होईल अशी चर्चा होती. त्याचवेळी शशिकला यांनी राजकीय संन्यास जाहीर केला आहे. जयललिता यांच्याशी कायम निष्ठावंत राहणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.