नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या काही तारखांमध्ये बदल करण्यात आलाय. नवीन बदलानुसार, आता बारावीची भौतिकशास्त्र व अप्लाइड फिजिक्सची परीक्षा 13 मे ऐवजी 8 जून आणि भूगोल परीक्षा 2 जून ऐवजी 3 जूनला होईल. तर, दहावीच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा पेपर 21 मे ऐवजी 2 जूनला होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बदललेल्या तारखा लक्षात ठेवाव्यात.
कोरोना काळात परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम असताना काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता सीबीएसई बोर्डाने आपल्या वेळापत्रकात बदल केले आहेत. 10 वी आणि 12 वीच्या काही विषयांच्या परीक्षा तारखांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.
सीबीएसई बोर्डाअंतर्गत घेण्यात येणारी 12 वीच्या विद्यार्थ्यांची फिजिक्स विषयाची परीक्षा 13 मे रोजी होणार होती. मात्र नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा 8 जून रोजी होईल. तसंच 12 वीच्या गणित विषयाची 1 जूनला होणारी परीक्षा 31 मे रोजी घेण्यात येईल.
12 वीच्या विद्यार्थ्यांची Web application ची परीक्षा 3 जून ऐवजी 2 जूनला होणार, तर भूगोल विषयाची परीक्षा 2 जून ऐवजी 3 जून रोजी होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सीबीएसई बोर्डाने बदललेलं वेळापत्रक त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलं आहे. इथे ते पाहू शकाल
10 वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयाची परीक्षा 21 मेच्या जागी 2 जून रोजी होणार, तर Frenchची 13 मे रोजी होणारी परीक्षा आता 12 मे रोजी होणार, विज्ञान विषयाची परीक्षा 15 मे ऐवजी 21 मे रोजी होणार तर संस्कृत विषयाची 2 जून रोजी होणारी परीक्षा 3 जून रोजी घेण्यात येईल.
* एसएससी, एचएससी बद्दल मोठी घोषणा
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची थेट विधानसभेतून मोठी घोषणा केलीय. राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केलं आहे.
यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.