पंढरपूर : भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव (रा.संतपेठ, पंढरपूर) यांच्याविरुध्द अवैध सावकराकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरझडतीमध्ये एकूण ४८ चेक, ९ हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅकपासबुके सह रोख रक्कम २९ हजार ३४० रूपये जप्त करण्यात आले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यात अवैद्य धंदे सुरु आहेत. अवैद्य वाळूसह अवैध सावकारकी करणारे इसम हे राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने तक्रारदार पोलीस ठाण्यात तक्रार देत नाहीत. मात्र एका तक्रारदाराने धाडस करीत शहर पोलीस ठाण्यात अवैध सावकारीची तक्रार दिली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या तक्रारीची चौकशी करताना सावकाराच्या घरी धाड टाकीत पोलीसांनी तब्बल ४८ चेक, ९ हिशोबी वह्यासह कोरे स्टॅम्प, चेकबुक, बॅंक पासबुकासह रोख २९ हजार २०० रुपये जप्त केले. याचबरोबर अवैध सावकार विदुल पांडुरंग अधटराव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
सावकारीबाबत तक्रार अर्ज आला होता. याची चौकशी करताना तक्रारीत तथ्य आढळलेने उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी मिटू जगदाळे, उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोहेका गोविंद कामतकर, सुनिल पवार, निता रोकडे, सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी प्रदीप सावंत, एस एस सांगोलकर, आदींनी केली.
* अवैध सावकारीबाबत पोलीसांचे आवाहन
परिसरातील अवैध सावकारी कर्जदारांची जमीन, जागा, वाहने अवैध रित्या गहाण ठेवून अवाजवी मुद्दल, दंड, व्याज आकारणारे सावकारांविरोधात तक्रार देण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.