सोलापूर : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमदार राजेंद्र राऊत यांचे स्वीय सहायक प्रशांत खराडे यांना ही धमकी कळवण्यात आली. शिवसेना नेते आणि माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांच्याविरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. यात प्रशांत खराडे (रा. शिवाजी आखाडा, बार्शी ) यांनी याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पाटील याने दि.3 मार्च रोजी फेसबुक लाईव्हद्वारे बार्शीचे आ.राजेंद्र राऊत व नगरसेवक अमोल चव्हाण यांना उद्देशून मी खुप हरामी माणुस आहे. माझ्या या दाढीच्या चेह-यामागे जो चेहरा आहे तो खुप कमी लोक ओळखतात. तुम्ही जर मुंबईला आलेले समजले तर तुम्हाला मुंबईतून बाहेर पडू देणार नाही. कारण माझे खुप भाई लोकांशी संबंध आहेत. भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात आपण राजकारण कराल व त्यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर गाठ माझ्याशी आहे. मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे माझे खुले आव्हान आहे.
मी बार्शीत येऊन नंग्या तलवारी नाचवीन माझ्या विरोधात कितीही पोलीस यंत्रणा व तुमच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा लावली तरी माझ्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. तुमच्या सोबत दहा पोलीस जरी ठेवले तरी काही होणार नाही असे म्हणून तलवारीने मारण्याची भाषा करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
पनवेल येथील नंदू उर्फ बाबा पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात भांदवि ५०७ कलम नुसार गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार आहेत. 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले होते. 2019 मध्ये शिवसेना उमेदवार आणि माजी आमदार दिलीप सोपल यांचा राजेंद्र राऊतांनी पराभव केला. सहा वेळा आमदारकी भूषवलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप सोपल यांचा राऊतांनी पराभव केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आमदार राऊत आणि भाऊसाहेब आंधळकर यांचं वैर सर्वश्रुत आहे. या दोघांचे कार्यकर्ते गेल्यावर्षी हाणामारीवर उतरले होते. मागील अनेक निवडणुकांमध्ये राजेंद्र राऊत आणि भाऊसाहेब आंधळकर यांनी एकमेकांना आव्हान दिलं होतं. भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केलं. त्यानंतर सोलापूर आणि विशेषत: बार्शीतील राजकीय राडेबाजी आणखी वाढल्याचं चित्र आहे.
* शिवसेना नेते अंधळकरांची उमेदवारी अशी हुकली
शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर दहा वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना बार्शीच्या तळागाळात रुजविण्याचे काम आंधळकर यांनी केलं. 2019 च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर होईल असं वाटत असतानाच राष्ट्रवादीच्या दिलीप सोपलांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेतलं.
सोपलांच्या राष्ट्रवादी सोडल्याने बार्शीत राष्ट्रवादीला खिंडार पडलं, तर शिवसेनेतही अंतर्गत वाद उफाळून आला. थेट बंडाची भाषा करण्यात आली. यासर्वांमध्ये भाऊसाहेब आंधळकर हे आघाडीवर होते. मात्र, त्याच आंधळकरांनी थेट दिलीप सोपलांच्या मागे राहू, असं सांगत प्रचाराचा नारळ फोडण्याचा आग्रह केला आणि सोपलांनी तो पूर्णही केला.