नवी दिल्ली : कोरोना काळात प्रतिबंधक नियमांचं पालन करताना खास करुन प्रवासावेळी प्रत्येकजण काळजी बाळगण्याचा प्रयत्न करतो. यात विमान प्रवासावेळी जास्त काळजी घ्यावी लागत आहे. पण दिल्लीहून पुण्यासाठी येणाऱ्या विमानात एक अजब प्रकार घडला आणि दिल्ली विमानतळावर एकच खळबळ उडाली.
दिल्लीहून पुण्यासाठी विमान उड्डाण घेण्यासाठी सज्ज असतानाच एका प्रवाशानं आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं. त्यानंतर संपूर्ण विमान अवघ्या काही मिनिटांत रिकामी करण्यात आलं. दिल्लीवरुन पुण्यासाठी उड्डाण घेणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानातील प्रवाशांमध्ये गुरूवारी संध्याकाळी एकच गोंधळ उडाला. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरुन पुण्यासाठी विमान टेक-ऑफ घेणार इतक्यात एका प्रवाशाने त्याला करोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं आणि प्रवाशांसह विमानातील क्रू मेंबर्समध्येही गोंधळ उडाला.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चार मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुण्याला जाणारं इंडिगो विमान(6E286) टेक-ऑफ करणार इतक्यात एका प्रवाशाने स्वतःला करोनाची लागण झाली आहे असं क्रू मेंबरला सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर तातडीने याबाबतची माहिती विमानाच्या पायलटला देण्यात आली , त्यानेही तात्काळ पावलं उचलत विमान टॅक्सी पार्किंग बेच्या दिशेने वळवलं. तिथे विमानातील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आलं, करोनाची लागण झाल्याचं सांगणाऱ्या प्रवाशालाही तिथे उतरवण्यात आलं.
* प्रवाशाला वैद्यकीय प्राधिकरणाकडे सोपवले
नंतर करोना झाल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाला विमानतळ वैद्यकीय प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले, तिथे त्याचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला, असे इंडिगोच्या अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवारी इंडिगोकडून याबाबत माहिती देण्यात आली. या दरम्यान विमानात सॅनिटायझरने स्वच्छता करण्यात आली, शिवाय सीटचे कव्हर्सही बदलण्यात आले. त्यामुळे विमानाला उड्डाण घेण्यास दोन तास उशीर झाला, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली. विमान कंपनीने केंद्र सरकार आणि विमान प्राधिकरणाने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये मात्र एकच गोंधळ उडाला होता. धावपट्टीवरुन विमान पुण्यासाठी उड्डाण घेणार त्याचवेळी हा प्रकार घडला.