सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रात्रीची संचारबंदी 14 मार्च पर्यंत वाढवली जाणार आहे. परराज्यातून सोलापुरात येण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध देखील 14 मार्च पर्यंत कायम राहतील. 25 फेब्रुवारी रोजी 7 मार्चपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले होते. तेच निर्बंध 14 मार्चपर्यंत कायम राहतील. परिस्थितीनुसार 14 मार्च रोजी पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्याआहेत. रुग्णसंख्या आणखी आटोक्यात आली नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेली रात्रीची संचारबंदी व शाळा बंदच्या निर्णयासह इतर प्रबिंधात्मक उपाययोजनांना 14 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी (रेल्वे स्टेशन, बसस्थानक, हॉस्पिटल, प्रार्थनास्थळे) विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
* असे आहेत आदेश
संचारबंदीत वाढ करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज काढला आहे. रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचार करण्यास प्रतिबंध असणार आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा (दहावी-बारावी वगळता), महाविद्यालयांचे नियमित वर्ग तसेच खासगी शिकवणी 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व अभ्यासिका व ग्रंथालय शासकीय नियम पाळून 50 टक्क्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी मात्र सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
मंगल कार्यालय (खुले अथवा बंदिस्त) लग्नकार्यासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांनी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व बार रात्री 11 पर्यंतच सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांवर 14 मार्चपर्यंत बंदी असणार आहे.