सोलापूर : गाव गुंडांनी सरपंचाला बेदम मारहाण केल्याची घटना आज बुधवारी मोहोळमध्ये घडली आहे. मासिक सर्वसाधारण सभा घ्यायची नाही, या कारणावरुन हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे सय्यद वरवडे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
ही घटना मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे ग्रामपंचायत कार्यालयात घडली. वाल्मिकी जालिंदर निळे (रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) असे जखमी सरपंचाचे नाव आहे. मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे ग्रामपंचायतीची सरपंच निवड २३ फेब्रुवारी रोजी पार पडली आहे. यात वाल्मिकी जालिंदर निळे यांची सरपंच तर पमाबाई शंकर कोरे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. त्यामुळे एकमेकाच्या विरोधी गटात नाराजी होती. त्याचे रुपांतर आजच्या मारहाणीत झाल्याचे सांगितले जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज बुधवारी नवनियुक्त सरपंचांच्या अध्यक्षतेखाली मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या मिटींगला जात असताना ग्रामपंचायत कार्यालयाच्या पोर्चमध्ये दरवाज्यात उभ्या असलेल्या गावातील गाव गुंडांनी “तू मीटिंगला जायचे नाही” असे म्हणून सरपंच निळे यांना ओढून बेदम मारहाण केली. यावेळी शिवराज निळे हे सोडवायला आले असता, त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली आहे.
या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाण करणाऱ्या गाव गुंडांवर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे मोहोळ पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे.