मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यानं धोका वाढला आहे. त्यामुळे काही भागांत प्रशासनानं निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही भागांत लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. याबद्दलचा निर्णय एक ते दोन दिवसांत घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गुरुवारी कोरोनाची लस घेतली आहे. मुंबईतल्या जे जे रुग्णालयात आज उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह आज हजेरी लावली. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना कोरोना लस देण्यात आली आहे. देशात 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. तसेच यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबद्दल कोणत्या उपाययोजना करण्यात येणार, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री ठाकरेंना विचारला. त्यावर काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. नागरिकांनी नियम पाळण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावा लागेल. पुढील एक-दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिल्यास नाईलाजानं लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे कोरोनाची लस घेत असताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीदेखील कोरोनाची लस घेतली. उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे.
”कोरोनाची लस अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही शंका बाळगू नये. मनात कोणताही किंतु-परंतु आणू नका. लस घेण्यास पात्र ठरल्यानंतर निश्चिंतपणे लस घ्या. त्यासोबत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेले नियमदेखील पाळा”
उद्धव ठाकरे – मुख्यमंत्री