नागपूर : नागपूर शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने शहरात 15 ते 21 मार्च कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या सीमेत कडक निर्बंधांसह हा लॉकडाऊन असेल. या सात दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा पूर्णपणे सुरु राहतील.
नागपूर शहरातली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 मार्च रोजी 1 हजार 700 पर्यंत पोहोचली. गेल्या तीन आठवड्यांपासून नागपूर शहरात शनिवार आणि रविवारी ऐच्छिक लॉकडाऊनही पाळण्यात येत आहे. पण या वीकेंड लॉकडाऊनला लोकांनी गांभीर्याने घेत नसल्याने कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.
या लॉकडाऊन काळात पोलिस आयुक्तालयाच्या सीमेतील खासगी कार्यालये बंद राहतील, तर उद्योग सुरू राहतील. सरकारी कार्यालयांमध्ये 25 टक्के उपस्थितीतच कामकाज चालवलं जाईल. मार्च महिना असल्याने ज्या सरकारी कार्यालयामध्ये ऑडिट किंवा अकाऊंट्सच्या कामांसाठी आवश्यकता असणारी कार्यालयं सुरू ठेवली जातील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नितीन राऊत म्हणाले, “शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरतांना आढळून आले आहेत. तसंच गृह विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांकडून सुद्धा नियमांचा भंग होतो. नागपुरात कोव्हिड-19 चा पहिला रुग्ण आढळून बरोबर एक वर्ष झाले आहे. पण नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन केलं नसल्याने वर्षभरानंतर शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे आता कडक लॉकडाऊन लावल्याशिवाय कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडली जाणार नाही. त्यामुळे 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान नागपूर शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या सीमेतील भागात कडक लॉकडाऊन असेल. शिवाय या दरम्यान कडक संचारबंदीही ठेवली जाईल.
* 7 दिवस दारूची दुकाने बंद
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागपुरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन केलेल्या क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहणार आहेत. तसेच दारूची दुकाने बंद राहतील. मात्र दारूची ऑनलाईन घरपोच सेवा सुरू राहणार आहे. दरम्यान, 15 ते 21 मार्च दरम्यान येथे कडक संचारबंदी असणार आहे.