नवी दिल्ली : सलामीच्या लढतीत दारुण पराभव झालेल्या ‘टीम इंडिया’ने दुस-या टी-20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा 7 गडी आणि 13 चेंडू राखून धुव्वा उडवला. पदार्पणवीर इशान किशनचे वादळी अर्धशतक आणि कर्णधार विराट कोहलीची मॅचविनिंग खेळी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली.
किशनने पदार्पणाच्या लढतीत ‘सामनावीरा’चा बहुमान मिळविला हे विशेष. हिंदुस्थानने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. धडाकेबाज खेळी साकारताना कर्णधार विराटने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत 12 हजार धावा करणारा कर्णधार म्हणून आपले नाव नोंदवले आहे.
इंग्लंडकडून मिळालेले 165 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 17.5 षटकांत षटकांत 3 बाद 166 धावा करून पूर्ण केले. पहिल्या लढतीत एका धावेवर बाद झालेल्या लोकेश राहुलला दुस-या लढतीत भोपळाही फोडता आला नाही.
सॅक कुरणने त्याला यष्टीमागे बटलरकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला पहिल्याच षटकात हादरा दिला. दुसरा सलामीवीर इशान किशन व आलेला विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानच्या डावाला आकार दिला. पदार्पणाच्या टी-20 सामन्यात अर्धशतक ठोकणारा किशन हा दुसरा हिंदुस्थानी फलंदाज ठरला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कसोटी, एकदिवसीय व टी-20 या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत 12 हजार धावा करणारा विराट कोहली हा पहिला कर्णधार ठरला. कुठल्याही संघाच्या कर्णधाराला आतापर्यंत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा गाठता आलेला नाही.
कर्णधार या नात्याने सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही कोहली तिस-या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग 15,440 धावांसह अव्वल स्थानावर आहे.
* रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर
इंग्लंडविरुद्ध काल दुसरा टी-20 सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद अर्धशतकी 73 (49) खेळी केली. यासोबतच विराटने एका विक्रमात रोहित शर्माला मागे टाकले आहे. विराटने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक (26) अर्धशतकांचा विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक अर्धशतकं: (1) विराट कोहली- 26, (2) रोहित शर्मा- 25, (3) डेव्हिड वॉर्नर- 19.