मुंबई : मुकेश अंबानी धमकी प्रकरण व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली. सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले. वाझे हे सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. दरम्यान, अधिवेशनात भाजपने वाझेंच्या निलंबनांची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने त्यास नकार दिला होता. आता एनआयएने तपास हाती घेतल्यानंतर सचिन वाझे यांना अटक करुन अनेक पुरावे ताब्यात घेतले आहेत. तपासअंती ठाकरे सरकारला नरमाईची भूमिका घ्यावी लागली.
आज सोमवारी सचिन वाझेंचे निलंबन करण्यात आले आहे. सचिन वाझेंचे दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे. यापूर्वी २००३ मध्य ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझेंचे निलंबन झाले होते.
मनसुख हिरेन मृत्यू गुन्ह्यात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयने त्यांना मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील कारमधील स्फोटक प्रकरणात शनिवारी (ता. १३) रात्री उशिरा अटक केली. या कारवाईनंतरच सचिन वाझेंचे पोलीस दलातून निलंबन होणार असे बोलले जात होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नियमानुसार कुठल्याही गुन्ह्यात सेवेतील अधिकाऱ्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर ही कारवाई केली जाते. कोणताही अधिकारी 48 तासांपेक्षा जास्त वेळ पोलीस कोठडीत असेल तर त्याचं निलंबन होतं. आता सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात करण्यात आलीय. पोलीस दलाच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे.
एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन वाझेंवर सर्वात आधी ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 16 वर्षानंतर वाझे यांना पोलीस खात्यात दुसऱ्यांदा संधी मिळाली होती. पण आता स्फोटक प्रकरणातील सहभागामुळे पुन्हा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टाने काल सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही सचिन वाझेंवर संशय आहे. एनआयए स्फोटक प्रकरणाचा तपास करतेय, तर एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे.