सोलापूर : गतवर्षी लॉकडाऊन झाल्याने शेतकर्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. अशा परिस्थितीत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कनेक्शन तोडण्याचा दिलेला आदेश निंदनीय असल्याचे सांगत, जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मोहोळ तालुक्यातील कुरूल गावात ऊर्जा मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
यावेळी बोलताना जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख म्हणाले की, विधिमंडळाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र, त्यानंतर दोनच दिवसांत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कनेक्शन तोडणीचा आदेश दिल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एकीकडे शेतकर्याच्या ऊसाबाबत एफआरपीचा कायदा करायचा आणि दुसरीकडे तोच कायदा पायदळी तुडवायचा, शेतकर्याला तुम्ही देणे असला ती त्याला झुलवत ठेवायचे, आणि येणे असले की लगेच वीज कनेक्शन तोडणे यासारखे प्रकार करायचे. राज्य सरकारचे हे वागणे अत्यंत चुकीचे आहे.
मोहोळ तालुक्यातील कुरूल चौकात जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी भैया देशमुख यांनी सरकारने वीज बिल माफ करावे, तसेच वीज कनेक्शन तोडणी आदेश थांबवावे, अन्यथा राज्यातील शेतकर्यांसमवेत रुमणे हातात घेऊन ऊर्जामंत्र्यांचा समाचार घेण्याचा इशारा दिला. या आंदोलनात जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.