सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार पद्मविभूषण शरद पवार यांना डी.लिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी देण्याचा ठराव संमत झाला आहे.
काल सोमवारी झालेल्या २३ व्या बैठकीत हा ठराव सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी मांडला. याला सिनेट सदस्य राजा सरवदे, प्रा. राजेंद्र गायकवाड, डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले. त्यास अधिसभेने बहुमताने मान्यता दिली. सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी मांडलेल्या प्रस्तावाला रिपाइंचे राजाभाऊ सरवदे, राजेंद्र गायकवाड व चंद्रकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले. हा ठराव सिनेट सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सिनेट सभेत मंजुरीनंतर या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे गरजेचे असते. त्यानंतर या प्रस्तावाला राज्यपाल कार्यालयातून मंजुरी मिळाल्यानंतर पदवीदान समारंभ होतो. सोलापूर विद्यापीठाने २०१४ मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सर्वप्रथम डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी) या मानद पदवीने सन्मानित केले होते. तसेच सोलापूर विद्यापीठाची पहिली डी.लिट पदवी ही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आली होती.
सचिन गायकवाड म्हणाले, शरद पवार यांचे देशासाठी व महाराष्ट्रासाठी मोठे काम असून त्यांना विद्यापीठाकडून डी. लीट पदवी देण्याचा प्रस्ताव सभेत मांडला. त्यावेळी रिपाइंचे ज्येष्ठ नेते तथा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासह अन्य दोन सिनेट सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले. ठराव बहुमताने मंजूर झाला असून आता तो विद्या परिषदेच्या माध्यमातून पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब होणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना डि. लिट पदवी देण्यासाठी प्रयास संघटनेच्या वतीने विद्यापीठाला निवेदन दिले होते. त्याचा पाठपुरावा सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी केला.
* 278 कोटी 97 लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी
यावेळी 2020-21 च्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली तर आगामी वर्षाच्या 278 कोटी 97 लाखांच्या अर्थसंकल्पास यावेळी मान्यता देण्यात आली. गतवर्षीच्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे 38 कोटींची तुट दाखविण्यात आली आहे. यावर सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांच्यासह अन्य सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारात धारेवर धरले. तर आगामी अर्थसंकल्प वाढीव का, असाही प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी नॅक मूल्यांकनामुळे आणि विद्यापीठाची नवी प्रशासकीय इमारत होत असून त्याठिकाणी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचीही इमारत होणार असल्याचे उत्तर कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिले.