नवी दिल्ली : भाजपचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचे निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शर्मा हे हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयाच्या जवळ असलेल्या निवासस्थानी शर्मा आज सकाळी मृतावस्थेत आढळले. यानंतर भाजपने आज होणारी संसदीय दलाची बैठक रद्द केली आहे.
हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदार क्षेत्रातील भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचं आज दिल्लीतील रुग्णालयात आजारानं निधन झाल्याचं वृत्त सकाळी आलं होतं. मात्र आता त्यात नवं वळण आलं आहे. खासदार रामस्वरुप शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
यामुळे रामस्वरुप यांचं निधन आजारानं झालं की ती आत्महत्या आहे याचा तपास सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, रामस्वरुप शर्मा यांच्या निधनानंतर भाजपच्या संसदीय मंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रामस्वरूप शर्मा यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रामस्वरुप शर्मा यांच्या निधनाचे वृत्त कळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले आहे. रामस्वरुप शर्मा यांच्या आकस्मिक निधनाने व्यथित झाल्याचं ते म्हणाले.
त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना ते प्रतिसाद देत होते. तसंच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र बुधवारी अचानक त्यांच्या निधनाची वार्ता आली आणि सर्वांना धक्का बसला. मात्र आता याबाबतची नवी माहिती समोर आली असून याबातमी सारे स्तब्ध झाले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोमती इमारतीच्या स्टाफकडून त्यांना सकाळी एक कॉल आला. रामस्वरुप यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद होता. कडी तोडून आत शिरल्यावर त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांनी सुरू केला असल्याचं सांगण्यात आलं.
रामस्वरूप शर्मा हे मंडी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले होते. शर्मा हे मूळ मंडी जिल्ह्यातील जोगेंद्रनगर येथील रहिवासी होते. संघटनेच्या कार्यात ते आधीपासूनच सक्रीय होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दादरा नगर हवेलीचे भाजपचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. त्याचा तपासही सुरू आहे.