कोलकाता : बंगालमध्ये अनेक हिंसक घटना समोर आल्या आहेत. आणि आता आणखी एक भीषण अशी हिंसक घटना समोर आली आहे. उत्तर परगनाच्या जगदलमध्ये क्रूड बॉम्बने हल्ला केला गेला आहे. या हल्ल्यामध्ये एका लहान मुलासहित 3 जण जखमी झाले आहेत. ज्या जागी हा हल्ला झाला ते ठिकाण भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घराजवळच आहे. भाजपने या हल्ल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करायचं ठरवलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष आणि राज्यात सत्तेवर येऊ पाहणारा भाजप पक्ष यांच्यामध्ये निवडणुकीदरम्यान वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चांगलीच जुंपली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उत्तर 24 परगना जिल्ह्यातील जगदल भागात बुधवारी रात्री 18 नंबर गल्लीमध्ये ही घटना घडली आहे, ज्यात तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र यावेळी त्यांना स्थानिकांच्या संतप्त आंदोलनाचा सामना करावा लागल्याची माहिती आहे. इतकंच नव्हे तर पोलिसांच्या उपस्थितीतच एक बॉम्ब फेकण्यात आल्याचा देखील आरोप आहे. सध्या या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे आणि यामागे काय हेतू आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार अर्जुन सिंह यांनी म्हटलंय की, जवळपास 15 ठिकाणी बॉम्ब फेकले गेले आहेत. पोलिसांद्वारे लावल्या गेलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना तीन लोकांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांद्वारा तोडलं गेलंय.
याबाबत पोलिस अधिकारी एसीपी एपी चौधरी यांनी एएनआयशी बोलताना म्हटलंय की, या हल्ल्यात एका मुलासहित 3 जण जखमी झाले आहेत. भाजप खासदाराच्या घराजवळ बॉम्ब फेकण्याच्या घटनेवर भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलंय की, टीएमसी हा ‘हिंसक राजकारणाचा’ पर्याय आहे. आचार संहिता लागू झाल्यावर देखील गुंड बॉम्बहल्ले आणि गोळीबार करत आहेत. निवडणुक आयोगाने हे आव्हान लक्षात घेतलं पाहिजे, अन्यथा मतदानात विघ्न येऊ शकतं.