भोपाळ : एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला संपूर्ण पगार मिळून ३६ लाख रूपये सरकारकडून मिळाले. पण आयुक्तांच्या छापेमारीत या व्यक्तीकडे ५ कोटी रूपयांची संपत्ती आढळल्याचं समोर आलं आहे. ११ तासांच्या चौकशीनंतर आयुक्तांनी सदर घटनेतील दोषी शिक्षक, त्याची पत्नी आणि वडिलांवर भ्रष्टाचार अधिनियम या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
बैतूलच्या बगडोनामधील एका आलिशान घरात राहणारे पंकज श्रीवास्तव रेंगाढाना गावातील एका सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांची नियुक्ती १९८८ मध्ये या शाळेत झाली होती. पंकज श्रीवास्तव यांच्याविरुद्द तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांनी पगारापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचं दिसून आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सरकारी नोकरीशिवाय हा माणूस सावकारीचं काम सुद्धा करतो. ज्यामुळे जे लोक कर्ज फेडू शकत नाही त्यांची संपत्ती बळकावण्याचं काम हा माणूस करायचा.
* सापडली २५ मालमत्तांची कागदपत्रे
तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीची तपासणी केली. पुढे, ही बाब खरी ठरल्यानंतर पोलिसांच्या पथकाने शिक्षकांच्या घरावर छापा टाकला. छापा टाकताना शिक्षकाच्या घरातून २५ मालमत्तांची कागदपत्रे सापडली. याशिवाय एक लाख रुपयांची रोकड व बँक खाती असलेले लॉकर याबाबतही माहिती मिळाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिक्षकाच्या घरातून मिळालेल्या कागदपत्रांवरून या मालमत्तेचे मूल्य पाच कोटी इतके आहे. शिक्षक पंकज श्रीवास्तव, त्याचे वडील रामजन्म श्रीवास्तव यांच्यासह पत्नीवर भ्रष्टाचार कायद्याच्या विविध कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयुक्तांच्या म्हणण्यानुसार या तिघांना जामिनावर सोडण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली गेली आहे.
* आढळली भरमसाठ स्थावर मालमत्ता
भोपाळमध्ये मिनल रेसिडेन्सी, समधारात भूखंड, पिपलियामध्ये एक एकर जमीन, छिंदवाड्यात ६ एकर जमीन, बैतूल येथे ८ निवासी भूखंड, बागडोना येथील १० वेगवेगळ्या खेड्यांमध्ये ६ दुकानं आणि शेती आहे. एकूण मूल्य सुमारे ५ कोटींची मालमत्ता असल्याचे समोर येत आहे. या शिक्षकाच्या बेकायदेशीर कमाईचा अंदाज यातून लावता येतो. त्याने गावातही एक आलिशान घर बांधले होते. यासह, भोपाळमध्ये डुपलेक्स आहे. व्हीव्हीआयपी लोकांची त्या सोसायटीत घरे आणि फ्लॅट असतात. पोलिसां या प्रकारणाचा खोलवर तपास करत आहेत.