मोहोळ : मोहोळ शहराला सर्व्हिस रोड नसल्याने पंढरपूर व विजापूरकडे वाहनांना जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावरुनच नागरिकांना ये जा करावी लागत आहे. यामुळे भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात आज एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
आज शुक्रवारी मोहोळ शहरातील होटेल लोकसेवा जवळ घडला. शिवाजी बाबू बंडगर (वय ३७ वर्षे, रा. रामहिंगणी ता. मोहोळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे.
रामहिंगणी येथील शिवाजी बाबू बंडगर यांचा दूध संकलन व विक्रीचा व्यवसाय आहे. हे दररोज दुचाकीवरुन दूध विक्री करतात. शुक्रवार १९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता मोहोळ शहरातील होटेल लोकसेवा लगत असणाऱ्या सोलापुर-पुणे महामार्गावरून बाहेर पडत्यानंतर विजापूर आणि पंढरपूरकडे जड वाहनांना जाण्यासाठी असणाऱ्या रस्यावरूनच नागरिकांना ये जा करावी लागते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याच रस्त्यावरून शुक्रवारी मृत बंडगर हे दुचाकीने (क्रमांक एम.एच. १३ सी.एक्स. २२४९) सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी समोरच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने (क्रमांक एच.आर. ५५. ६७३२) त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने शिवाजी बंडगर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक जागेवरच सोडून पळ काढला.
या अपघातामुळे रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालय पाठविला. यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
या प्रकरणी मयत शिवाजी बंडगर यांचे पुतणे आप्पासाहेब मल्हारी बंडगर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अशोक गायकवाड हे करीत आहेत.