मुंबई : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनामुळे 10 वी आणि 12 वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल, असं गायकवाड यांनी सांगितलं आहे. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिक्षेबाबत काही महत्वाचे निर्णय बोर्डाने आधीच घेतले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इ. 10 वी ची लेखी परीक्षा 29/04/2021 ते 20/05/2021 या कालावधीमध्ये ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे. इ. 12 वी ची परीक्षा दि.23/04/2021 ते 21/05/2021 कालावधीमध्ये ऑफलाईन पध्दतीने लेखी परीक्षा होईल. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.
दरवर्षी 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 3 तास वेळ दिला जात असे. परंतु, यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 व 50 गुणांच्या परिक्षेसाठी 15 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.