पुणे : पुण्यात मध्यरात्री भयंकर आग लागली. या आगीत 800 च्या जवळपास दुकानं जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये ही आग लागली. 3 तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या आगीत व्यापाऱ्यांचे करोडोचे नुकसान झाल्याचा अंदाज वक्त केला जात आहे. या ठिकाणी कपड्यांची मोठी दुकाने अन् गोदामं असल्याने आग पसरली.
पुण्यात काल शुक्रवारी रात्री उशिरा कँप परिसरातील फॅशन स्ट्रीटला आग लागली. आग लागण्याचे कारण अद्याप समजले नाही. मात्र आगीचा मोठा भडका उडाला. तातडीने अग्नीशमन दलाच्या आठ बंबगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
Maharashtra: Fire breaks out at Fashion Street market in Camp area of Pune. Fire tenders rushed to the spot. More details awaited. pic.twitter.com/EMepVu2TdE
— ANI (@ANI) March 26, 2021
याआधी मुंबईत भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली असून अशा पद्धतीने राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत त्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही दिले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वाढत्या कोविड संसर्गामुळे विविध इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारच्या फिल्ड रुग्णालयांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. आजच्या दुर्घटनाग्रस्त रुग्णालयास देखील तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीच मी भंडारा येथे जिल्हा रुग्णालय आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी करुन घेण्याचे निर्देश दिले होते.
त्याचप्रमाणे कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील सर्व फिल्ड रुग्णालये व इमारतींमधील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची खातरजमा करुन घेण्यात यावी असे निर्देश मी देत आहे. मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त व महापौर यांच्याशी देखील ही दुर्घटना कळताच चर्चा केली. जखमी तसेच कोविड रुग्णांना इतरत्र व्यवस्थित उपचार मिळतील हे पाहण्यास सांगितले आहे. भांडुपच्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
* आग विझवून घरी जाताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचे निधन
कॅम्प परिसरातल्या फॅशन स्ट्रीटला लागलेली आग विझवून घरी निघालेल्या, कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रकाश हसबे असे मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अग्निशमन दलाचे प्रमुख होते.
आग विझल्यानंतर प्रकाश हसबे पहाटे घरी जायला निघाले. मात्र रस्त्यातच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दुर्देवी निधन झाले. कर्मचाऱ्यांना दोन तासात पुन्हा कामावर परत येतो असे सांगून ते कॅम्प येथून निघाले. येरवडा मार्गावरून जात असताना रस्त्यातवर त्यांचा अपघात झाला.