पुणे : हे सरकार टिकेल हे तुम्हाला का सांगावं लागतं. असं सांगावं लागतं तेव्हा काही तरी गडबड आहे. हे समजून जायचं असतं, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. आजारी नसलेल्या माणसाला तो आजारी नाही हे सांगावं लागत नाही. तो ठणठणीत असल्याचं दिसून येतं. असं सांगतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तब्येत बिघडली हे माहीत आहे. परंतु सरकारचं मला माहीत नाही, असेही ते म्हणाले.
अमित शाह रात्रीच्यावेळी शरद पवार यांना भेटल्याचे समजते. अमित शाह यांना भेटण्याची वेळ रात्रीचीच असते. ती निवांत भेट असेल. पण शरद पवार अहमदाबादला जाऊन अमित शाह यांना निवांतपणे का भेटले, याचा विचार झाला पाहिजे. परंतु, नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आमच्या नेत्यांची विचारांवर सर्वोच्च निष्ठा आहे. त्यामुळे तो सांगतील तो निर्णयच आमच्यासाठी अंतिम असेल, अशी पुस्तीही चंद्रकांत पाटील यांनी जोडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या कथित भेटीच्या वृत्तानंतर भाजपच्या नेत्यांनी सूचक वक्तव्ये करायला सुरुवात केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचं काही ठरलंच तर गेल्यावेळसारखं शपथविधी झाल्यावर कळेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. कार्यकर्त्यांमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार आहे, अशी चर्चा असल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे सूचक विधान केले.
ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना शरद पवार आणि अमित शाह यांच्या 26 मार्चला अहमदाबादमध्ये झालेल्या कथित भेटीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी राजकारणात अशा भेटी झाल्या पाहिजेत, असे म्हटले. राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं. मात्र, नेत्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून अशा भेटीगाठी कमी झाल्या होत्या. अमित शाह आणि शरद पवार यांची भेट राजकीय कारणासाठी होते, असे नाही. त्यामागे एखादे समाजोपयोगी कारणही असू शकते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
मात्र, शरद पवार आणि अमित शाह यांच्यात नक्की भेट झाली का, हे मला माहिती नाही. पण अमित शाह यांनी काल केलेलं वक्तव्य पाहता ही भेट झाली असावी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशी भेट झालीच नाही, हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. यामुळे उलट शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाली हीच गोष्ट शिक्कामोर्तब होत आहे. महाविकासआघाडीचे नेते वारंवार सरकारला धोका नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हेच सिद्ध होत असल्याचा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.