सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे.
त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोघेही आज पंढरपुरात उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा तनपुरे मठात मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्याला संबोधित केलं. देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण ३ तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही, असे पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे, भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“पवारसाहेब तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची काळजी करु नका. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, इकडचा कार्यक्रम आमचं आम्ही करतो”, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरवलं आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील पंढरपुरात होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्यामुळे ३१ मार्चला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवार पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. त्याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता, ते म्हणाले, “शरद पवार यांच्यावर उपचार सुरु आहेत. वैद्यकीय सल्ल्याने ते बाहेर पडतील. या मतदारसंघाची काळजी करु नका असं सांगितलं आहे. प्रचाराला कोण नेते येतील याचं नियोजन लवकरच होईल.
* परिचारक – आवताडे दोघांचे कार्यकर्ते भालकेंच्या संपर्कात
सगळ्यांशी चर्चा करुन भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. वातावरण चांगलं आहे. विजय निश्चित आहे. बंडखोरी झाली असली तरी त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहे अर्ज माघरीच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सर्व कायकर्ते घराघरात जाऊन प्रचार करतील, कोरोना काळ असला तरी अनेक राज्यात विधानसभा निवडणुका सुरु आहेत. भाजपचे प्रशांत परिचारक आणि उमेदवार समाधान अवताडे दोघांनी एकमेकाविरोधात निवडणूक लढवली आहे. त्यांचे कार्यकर्ते एकत्र येतील असं वाटत नाही. त्या दोघांचे अनेक कार्यकर्ते भगीरथ भालके यांच्या संपर्कात आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला.