अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करायला भाग पाडणारा आरोपी विनोद शिवकुमार याला पोलीस कोठडीत खास सुविधा मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून त्याला देण्यात आलेल्या या व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे संताप व्यक्त होतोय. शिवकुमारला त्याच्या कोठडीत एक पंखा लावून देण्यात आला आहे. त्याला दररोज जेवणासाठी मटनाचा डबाही पुरवला जात असल्याचा आरोप आहे.
दरम्यान दीपाली चव्हाण यांच्या आईने आरोपी शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. विनोद शिवकुमार याचं निलंबन करुन श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
विनोद शिवकुमार याला पोलीस कोठडीत खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून त्याला देण्यात आलेल्या या व्हीआयपी ट्रीटमेंटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवकुमारला त्याच्या कोठडीत एक पंखा लावून देण्यात आला आहे. याशिवाय, त्याला दररोज जेवणासाठी मटनाचा डबाही पुरवला जात आहे. अमरावतीमधील भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी हा आरोप केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवकुमारला न्यायालयात आणले तेव्हा संतप्त महिलांनी त्याला गराडा घातला होता. शिवकुमारला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी या महिलांनी केली होती.
डीएफओ विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दीपाली यांनी आत्महत्या केल्याने धारणी पोलिसांनी त्याला नागपुरातून अटक केली. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर शेकडो महिलांनी पोलीस ठाण्यात धडक दिली होती. आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी महिलांनी केली.
आरोपीला कोर्टात नेत असताना महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या. शिवकुमारचा निषेध व्यक्त करत महिलांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तसंच त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचीही मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी मानवी साखळी करुन आरोपीला कोर्टात हजर करावं लागलं.