सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आज रविवारी सोलापूर आणि बार्शी दौऱ्यावर आहेत. आपल्या इंदापूर या मूळ गावावरुन सोलापूरकडे त्यांचा ताफा जात असताना वाटेत अपघात झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. हा अपघात बाराच्या सुमारास झाला होता. अपघात ग्रस्ताच्या हाताच्या बाहूतून रक्त वाहत होते.
त्यावेळी, तत्काळ तत्परता दाखवत पालकमंत्री भरणे यांनी आपल्या गाडीतून उतरुन जखमींना मदत केली.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
पालकमंत्री भरणे यांच्या तत्परतेबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल स्थानिकांकडून त्यांचं कौतुक होत आहे.
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज रविवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातही ते भेट देणार असून बार्शीतील शहीद जवान भास्कर वाघ यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी वाघाची वाडी येथे जाणार आहेत. इंदापूर येथून दत्तात्रय भरणे सोलापूरच्या दिशेने निघाले असता, पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर अपघात झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली.
त्यावेळी, तत्काळ भरणे यांनी गाडीतून उतरत संबंधित अपघातातील जखमींची विचारपूस केली. तसेच, जखमींना खासगी गाडीने रुग्णालयात पाठविण्यात आले. यासंदर्भात संबंधित डॉक्टरांनाही फोनवरुन सूचना दिल्या. यावेळी त्यांच्याबरोबर मोहोळचे आमदार यशवंत माने ही हजर होते. त्यांनी अपघातग्रस्तास मदत केली.