सोलापूर : अॉनलाईन खरेदी विक्रीतील अडचणी ग्राहक आणि विक्रेत्यांचीही अडचण लक्षात घेऊन सोलापूर शहर व परिसरात प्रत्यक्ष बकरी खरेदी-विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवेदनाद्वारे आली आहे. राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन आज रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले.
मुस्लिम बांधवांमध्ये महत्वाचा समजल्या जाणाऱ्या बकरी ईद निमित्त मुंबई व पुणे यासह मोठ्या शहरात ऑनलाईन बकरी खरेदी-विक्रीला परवानगी मिळाली आहे. ऑनलाईन बकरी खरेदी-विक्रीतून बकरी तंदुरुस्त असल्याचे समजत नाही. तसेच सर्वजण इंटरनेटचा वापर करत नाहीत. बकरी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान व बकरी खरेदी करणाऱ्यांना चांगली बकरी मिळण्याची शक्यता कमी आहे.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी आपला मुद्दा निवेदनात मांडला आहे. सोलापूर शहरात एक ते तीन ऑगस्ट या कालावधीत बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. सोलापूर सारख्या छोट्या शहरात ऑनलाईन बकरी खरेदी-विक्री शक्य नाही. बकरी ईदसाठी अनेक शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून बकरी पाळून मोठे करतात, त्यामुळे खरेदी विक्रीला परवानगी द्यावी.
यावेळी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, अहमद मासुलदार आदी उपस्थित होते.