सांगली : मुंबई – बंगळुरु हायवे लगत केदारवाडी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. शिराळा वनपरिक्षेत्रातील इस्लामपूर परिमंडळ अंतर्गत भवानीनगर क्षेत्रातील पुणे बंगळुरु हायवेलगत बिबट्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत कासेगाव तालुका वाळवा पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात माहिती दिली.
या घटनेबाबत वनरक्षक दिपाली सागावकर, वनपाल मिलिंद वाघमारे, वनकर्मचारी यांच्यासह घटनास्थळावर पोहोचून शहानिशा केली. यावेळी सदर बिबट्याचा मृतदेह मादी जातीचा असल्याचे आढळून आले आहे. बिबट्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे असावे. घटनास्थळाची प्राथमिक तपासणी केली असता मृत्यू त्याचा कान, नाक, व तोंडातून रक्त आल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्राण्याच्या मृतदेहाची शवचिकित्सा इस्लामपूर, तालुका वाळवा येथील पशुवैद्यकीय अधिकारी अंबादास माडकर यांनी केली. बिबट्याचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकरणाची चौकशी सांगलीचे उपवनसंरक्षक पी.बी. धानके,जी. एस. चव्हाण, वनक्षेत्रपाल सुशांत काळे, मिलिंद वाघमारे, दिपाली सागावकर, करत आहेत. या प्रकरणी कासेगावचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी, तसेच प्राध्यापक सुशील गायकवाड, विशाल गायकवाड यांनी तपासकामी मदत केली.