सोलापूर : वालचंद कॉलेजच्या बॉइज् हॉस्टेल येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये एका 68 वर्षीय महिलेचा आज बुधवारी सकाळी मृत्यू झाला आहे. त्या महिलेला दम्याचा त्रास होता. तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत, असा आरोप तेथील इतर रुग्णांनी केला आहे.
ही माहिती कळताच या भागातील नगरसेवक कोटा तसेच गुरुशांत धूत्तरगावकर घटनास्थळी पोहोचले आहेत. या महिलेचे नातेवाई ही येथे पोहोचले आहेत. त्यांनी या सेंटरमध्ये ही महिला डॉक्टरांना त्रास होतो आहे, असं सांगूनही महिलेला वेळेवर औषध दिलं गेलं नाही किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली गेली नाही म्हणून तिचा मृत्यू झाला, अशी तक्रार होत आहे. या प्रकरणी डॉक्टरांवर तसेच संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत असल्याची माहिती नगरसेवक गुरुशांत धूत्तरगावकर यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पालिकेचे उपायुक्त पंकज जावळे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाची माहिती घेत असल्याचं सांगितले. या महिलेचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. 24 तारखेला ही महिला दाखल झाली होती. मंगळवारी तिचा स्वॅब घेण्यात आला होता. तीन दिवसापासून या महिलेला त्रास होत होता पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडी दाखवली नाही, असाही आरोप आहे.