रत्नागिरी : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी कोकणच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांनी ‘आपण या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार’ असल्याच्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांचा कोकण दौरा केला. विरोधी पक्षनेते कोकणातील नुकसानीची पाहणी दौऱ्यावर गेले मात्र मुख्यमंत्र्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ कधी संपणार ? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे? विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शुक्रवारी कोकण दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. मात्र मुख्यमंत्र्यांआधीच देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये अख्खी राष्ट्रवादी उतरली, संपूर्ण प्रशासनाचा गैरवापर करण्यात आला. पण जनतेनं आमच्या उमेदवाराला निवडणूक दिलं. मी पंढरपूरच्या जनतेला शब्द दिला होता या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी माझ्या विधानावर ठाम आहे, पण आता सध्या ही वेळ नाही. आपण कोरोनाशी लढत आहोत, आम्हाला कोरोनाशी लढायचं आहे, या सरकारशी लढायचं नाही. ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवेल’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
‘रश्मी शुक्ला यांचा जो अहवाल आहे, तो जर बाहेर आला तर या सरकारला तोंड दाखवण्यासाठी जागा उरणार नाही. त्यामुळे हे सरकार न्यायालयात गेले आहे आणि चौकशी करू नये, अशी विनंती करत आहे. हे सरकार त्यांच्याच अंतर्विरोधामुळे पडेल हे मी आधीच सांगितलं होतं, आता त्याची वेळ जवळ येत आहे. त्याकडे वाटचाल आता सरकारची सुरू झाली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.