सांगली : राजकारणात कुस्ती आणि कुस्तीत राजकारण या गोष्टी आपल्यासाठी नव्या नाहीत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कुस्तीतली वाक्ये खूपच गाजली. मात्र, खऱ्याखुऱ्या कुस्तीतला ‘हिरो’ असणारा एक चेहरा आता राज्यपाल नियुक्त थेट (खेळाडू आमदार) साठी इच्छुक असल्याची माहिती मिळते आहे.
सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यातील भाळवणी गावचे पैलवान, डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील हे खेळाडू आमदारकीसाठी इच्छुक आहेत. 28 जुलै रोजी त्यांनी यासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतली. भेट ही अर्थातच येणाऱ्या राज्यपाल नियुक्त थेट आमदारकीच्या खेळाडू आमदार पदाबाबत असल्याची माहिती मिळते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कुस्ती क्षेत्रात हिंदकेसरी मारुती माने यांना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कालखंडात थेट खासदार होण्याचा बहुमान मिळाला होता तर क्रिकेटचा देव असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनाही थेट खासदार करण्यात आले होते. कुस्तीसारख्या रांगड्या खेळातून दोन वेळा महाराष्ट्र केसरी असणारे तसेच राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषदेवर यापूर्वी निवडून येणारे चंद्रहार पाटील यांची यावेळी राज्यपाल नियुक्त थेट आमदार होण्याची इच्छा आहे.
मागच्या आठवड्यात चंद्रहार पाटील यांचे नातलग व सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचीसुद्धा याच कारणास्तव भेट घेतली होती. डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांचा मित्रपरिवार महाराष्ट्रभर विखुरला आहे. विटा (ता.खानापूर जि.सांगली) येथे ते भारतातील सर्वात मोठे कुस्ती केंद्र स्थापन करत आहेत. चंद्रहार पाटील यांच्या सिल्व्हर ओक भेटीमुळे राज्यपाल नियुक्त थेट खेळाडू आमदार चर्चेला आता सांगली पंचक्रोशीत उधाण येत आहे.
* झाली होती एका प्रकरणात अटक
तहसीलदाराला मारहाण केल्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना अटक करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना चंद्रहार पाटील यांनी मारहाण केल्याची फिर्याद होती. याच वर्षात 3 मे रोजी हा प्रकार घडला होता.