नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत हिच्या मनाली येथील घरावर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी कंगना रानावतच्या टीमने काल शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसात तक्रार दाखल केली. यासंबंधी बोलताना कंगनाने हा तर मला घाबरवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
कंगनाच्या मनालीच्या घराजवळ गोळीबार झाल्याचे आवाज ऐकू आल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर कुलू पोलिसांनी कंगनाच्या घरी जाऊन प्राथमिक तपास केला. दरम्यान, पोलिसांना अद्यापतरी कोणता सुगावा लागलेला नाही. मात्र पोलिसांनी कंगनाच्या मनाली येथील घरावर सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कंगनाने याबाबत माहिती दिली की, मी माझ्या बेडरुममध्ये होते. रात्रीचे साधारण साडेअकरा वाजले होते. मला फटाक्यांसारखा आवाज ऐकू आला. आधी मला वाटले की कोणीतरी फटाकेच फोडले असावेत. परंतू जेव्हा दुसऱ्यांदा तसाच आवाज आला तेव्हा मी सावध झाले. हा गोळीचा आवाज होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनालीमध्ये पर्यटकदेखील नाहीत. त्यामुळे फटाके कोण आणि का फोडेल. त्यामुळे मी त्वरीत सुरक्षा रक्षकांना बोलावले. मी जेव्हा त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, काही मुलांनी हा खट्याळपणा केला असावा. त्या सुरक्षा रक्षकांनाही गोळीचा आवाज ऐकू आला नसावा. त्यावेळी घराबाहेर कोणीच नव्हते. आम्ही घरामध्ये ५ जण होतो. नंतर आम्ही पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार सफरचंदावर बसणाऱ्या वटवाघुळाला घाबरवण्यासाठी मालकाने आवाज केला असावा. मात्र बागेच्या मालकाने त्यास नकार दिल्याने कोणीतरी घाबरवण्यासाठी हा गोळीबार केल्याचे लक्षात आले. कंगनाच्या मते सुशांत प्रकरणात तिने राजकीय नेत्यांची नावे घेतल्याने तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी पथक तैनात केले असून, कुल्लुतून जाणाऱ्या – येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. कुल्लूचे एसपी गौरव सिंह यांनी याबाबत माहिती दिली. कंगनाच्या घराभोवतीच्या परिसराची तपासणी करण्यात येत आहे.