बार्शी : कोरोनामुळे बाजारपेठेत गेल्यामुळे होणार्या संसर्गाचा धोका तसेच चीन बरोबर सध्या सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी राख्यांवर बहिष्काराचे होत असलेले आवाहन, या पार्श्वभूमीवर बार्शीतील जलमित्र संदीप पवार यांनी घरातच उपलब्ध असलेल्या वस्तूंचा योग्य वापर करत पर्यावरणपूरक राख्या बनविल्या आहेत.
एरवी रक्षा बंधन झाल्यानंतर सगळ्या राख्या या अखेर कचर्यातच जातात, मात्र पवार यांनी बनविलेल्या या राख्या या विविध बियाणेयुक्त असल्यामुळे सणाच्या आनंदाबरोबरच बहिणाबाई-भाऊरायाला पर्यावरण संतुलनाला मदत केल्याचे समाधान मिळणार आहे. संदीप पवार हे पाणी फाऊंडेशनच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पाणी आणि वृक्षाचे परस्परावलंबन त्यांना चांगलेच ठाऊक आहेत. त्यामुळे राख्या तयार करताना इतर कोणत्याही शोबाज वस्तूंपेक्षा बियाण्यांचा वापर केल्यास सणानंतर हेच बियाणे वृक्षारोपणासाठी मदतीला येतील या विचाराने त्यांनी घरातील किचनमध्ये असलेल्या डाळी, तांदूळ, जिरी, मोहरी, गहू, त्याचप्रमाणे दोडका, कारले, भोपळा, शेवरी, भेंडी, करंजी, मेथी, शेवगा यांसारख्या सहज उपलब्ध होणार्या अनेक बिया वापरल्या.
राखी बांधायला लेस म्हणून जुन्या साडीचा कपडा वापरला. यात कुठंही प्लास्टिक, कलर किंवा निसर्गाला हानी पोचवणारी एकही गोष्ट त्यांनी वापरली नाही. ही राखी जर मातीमध्ये पुरून टाकली तर नक्कीच त्यामधील बियामधून रोपटे तयार होईल व त्याचा पर्यावरणाला व आपणाला नक्की फायदा होईल. त्यामुळे कोरोना संक्रमणापासून स्वतःला व कुटुंबाला दूर ठेवा. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावा. असा संदेश देत त्यांनी अशा राख्या तयार करा, असे आवाहन केले आहे.