उस्मानाबाद : जिल्ह्यात काल शनिवारी भाजपच्या एका आमदाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुध दराचे आंदोलन केले. पण ज्यांना दुधाचा व लोण्यातील फरकही कळत नाही, अशानी आंदोलनाचा स्टंट केल्याची टीका खासदार ओमराजे निंबाळकरांनी आमदार राणाजगजितसिंह पाटलांवर केला.
जिल्ह्यातील दुध संघ ज्यांच्यामुळे बंद झाला त्याच्या नेतृत्वाखाली दुधाचे आंदोलन व्हावे यापेक्षा हास्यास्पद गोष्ट नाही, अशी कोपरखळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता मारली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपने आंदोलन करण्याऐवजी राज्यातील दुध उत्पादकांसाठी केंद्र शासनाकडून काय मदत करणार हे पहिल्यांदा जाहीर करावे. यापूर्वी केंद्र शासनाने दहा हजार टन दुध पावडर आयात केली. त्यावेळी भाजपने दूध उत्पादकांचा विचार का केला नाही? व्यापाऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने निर्णय घ्यायचा आणि त्याचा भुर्दंड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोसायचा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय नाही का? असा सवालही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भाजपच्या आंदोलनावर उपस्थित केला.
* अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रकार
दुध दरवाढीचे आंदोलन म्हणजे आमदाराचे अस्तित्व दाखवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचाही गंभीर आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्याला लाभले आहेत. त्यामुळे दुध उत्पादकांना मदत करणार यात अजिबात शंका नाही. परंतु भाजपच्या आमदारानी केंद्राला जाब विचारण्याची धमक दाखवावी म्हणजे तुमची तळमळ शेतकऱ्यांना कळून येईल, अशी अपेक्षा ओमराजे यांनी व्यक्त केली.