आजच्या बदलत्या जीवनशैलीत झोपेचे अगदी खोबरे होऊन गेले आहे. आज माणूस फक्त पैसे छापण्याच्या मागे लागला आहे. जीवघेणी स्पर्धा त्याला स्वस्थ बसू देत नाही. साहजिकच झोप पळून गेली आहे. परवाच एक धक्कादायक बातमी वाचायला मिळाली. संपूर्ण जगात झोपेच्या गोळ्यांचा व्यापार नऊ अब्ज डॉलरचा असल्याची ती बातमी होती.
सर्व्हेक्षणानुसार जगातल्या 85 टक्के लोकांना गाढ झोप येत नाही. यातले 53 टक्के लोक सांगतात की, त्याचा त्यांच्या कामावर परिणाम होतो. अमेरिकेसारख्या देशात तर झोप ही नैसर्गिक क्रियाच राहिलेली नाही. तो एक आजारच जडलेला आहे. रात्रीची झोप ही त्यांच्या सवयींवर अवलंबून आहे. जे लोक दिवसा कष्ट, मेहनत करत नाहीत, त्यांना रात्रीची झोप येत नाही. झोपेची समस्या मोठी गंभीर बनली आहे.
आपण स्वत:कडे लक्ष देत नसल्याचा हा पुरावा आहे. फक्त काम आणि काम. खरे तर झोप व्यवस्थित होत नसेल तर माणसामध्ये उत्साह कसा निर्माण होणार? साहजिकच कामाच्या ठिकाणी त्याचा परिणाम होऊन आपली प्रतिमा मलीन होण्याचीच शक्यता आधिक आहे. शरीर स्वास्थ्य ठीक नसेल तर राबण्याला काय अर्थ आहे? बैल घाण्याला जुंपवल्यासारखा हा प्रकार आहे. अर्थात झोप चांगली यायला हवी, यासाठी कष्टाची आवश्यकता आहे. आपण केलेल्या अन्नग्रहणातून जी ऊर्जा तयार होते,ती मुरली पाहिजे, नाही तर मेद वाढत जातो.
ही दुसरी समस्या त्यातून निर्माण होते. त्यातून लठ्ठपणा वाढला की, हळूहळू एक-एक आजार येऊन शरीराला चिकटतात. मग दवाखान्याचे हेलपाटे सुरू होतात आणि कमावलेला पैसा पुन्हा शरीरासाठी खर्च करावा लागतो. तेच जर शरीर स्वास्थ्य राखून काम केल्यास साठवलेली गंगाजळी म्हातारपणी सत्कारणी लागते. पण माणूस एक असा प्राणी आहे,त्याची हाव काही कमी होत नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
झोपेचे खोबरे होऊ नये,म्हणून आपल्या आयुर्वेदात अनेक उपाय सांगितलेले आहेत. रानात राबणार्या माणसाला अशा उपायांची गरज नसते. त्याची खरी गरज ही पांढरपेशा माणसाला अधिक आहे. दिवसभर बैठे काम करणार्याला याची आवश्यकता आहे. यासाठी आचार्य ओशोंनी एक साधा सरळ उपाय सांगितला आहे. खोलवर श्वास घेण्याचा उपाय. दिवसभर खोलवर श्वास घेत राहा. काम करताना, चालताना, बोलताना सातत्याने आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचे. जितका खोलवर श्वास घ्याल, तितका अधिक प्राणवायू आत जाईल. याला हायपर ऑक्सिजनेशन असे म्हणतात. याचा परिणाम झोपेवर होतो. जर खोलवर श्वास घ्याल,तर झोपसुद्धा गाढ येईल. माणसे विचार करतात की, उशीरापर्यंंत झोपले म्हणजे चांगली झोप घेतली. पण झोपेचे गणित जरा उलटे आहे, ती जितकी गाढ असते,तितका त्याचा वेळ कमी होतो. झोपेची खरी गरज आहे, ती शरीराला आराम मिळावा यासाठी! ते एक यंत्र आहे. त्याला विश्रांतीची गरज आहे.
पण यासाठी म्हणजे झोपेची तयारी दिवसभर करावी लागते. ज्या झोपेनंतर तुम्हाला ताजेतवाना वाटते, ती खरी आरामशीर झोप. जर उठल्यानंतरही आपल्याला जडपणा येत असेल, आळस वाटत असेल तर ती झोप स्वस्थ नाही, असे समजायचे. आरामशीर झोप यायची असेल तर मन शांत असायला हवं. आजकालचे लोक मनाचा वापर अधिक करताना दिसतात. आणि शरीराचा वापर कमी. ही अस्वाभाविक परिस्थिती आहे. मनाला असे एखादे बटन आहे, जे आपल्या विचारांना बंद करू शकते आणि ते बटन म्हणजे खोलवर श्वास. या बटनाचा सतत वापर करा आणि छान झोप घ्या. दीर्घायुष्य जगा.
– मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली