रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळई गावात दरड कोसळली आहे. यामध्ये जवळपास 32 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर आणखी एका ठिकाणी दरड कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसांपासून या भागात पाऊस होत आहे.
कोकणातील विविध भागात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. यातून अनेक दुर्घटना घडत आहेत. काही ठिकाणी पूल कोसळले आहेत, तर काही ठिकाणी पुराच्या पाण्यात लोक वाहून गेल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. त्यातच आता महाडमध्ये तब्बल 30 घरे ढिगाऱ्याखाली मातीमोल झाले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.
महाडमधील दुर्घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाकडून मदतकार्याच्या हालचालीना वेग आला आहे. मात्र पुराच्या पाण्यामुळे घटनास्थळी मदत पोहोचवण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार तेथील ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिकाकडून होत आहे.
महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली आहे. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झाली आहे. मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील, त्यामुळे छतावर जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.
कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड तसेच कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. येथे पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी तर घरांत पाणी घुसले आहे. चिपळूनच्या रस्त्यावर तब्बल 10-10 फूट पाणी साचले आहे. या पूरस्थितीमध्ये अनेक नागरिक त्यांच्या घरात अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी, बचाव करण्यासाठी बचावपथकं तैनात केली आहेत. या घरामधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
राज्यातील सांगली, रायगड, रत्नागिरी , कोल्हापूर भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. तुफान पावसामुळे 32 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये पाऊस सुरु आहे. या पावसामुळे तेथे दाणादाण उडाली आहे. काल गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 32 ते 35 घरे दबली गेल्याचे वृत्त आहे. घरांची निश्चित संख्या आणखी अधिकृत कळू शकली नाही. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे.
“एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही. सरकार भावनाशून्य झालंय. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, माझी शासनाकडे विनंती आहे की या घटनेकडे गांभीर्याने बघून त्वरित मदत कार्य सुरू करा”
प्रवीण दरेकर – विरोधी पक्ष नेते,
विधान परिषद