सोलापूर : कोरोनाचे सावट असतानाही सोमवारी घरोघरी बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. कोरोना संसर्गात अत्यावश्यक सेवा देणार्या बहीण-भावांच्या मात्र भेटीगाठी झाल्या नाहीत. सोशल मीडियावरुनच शुभेच्छा व व्हिडीओ कॉलद्वारेच सण साजरा झाला.
दरवर्षी सणासाठी मुबलक प्रमाणात सोडण्यात येणार्या एसटी व बस सेवा सुरु नसल्याने व जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी बंदी असल्याने बर्याच बहीण-भावांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही नात्यातील वीण अधिक घट्ट झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरवर्षीच्या तुलनेत राख्यांचा खप जास्त झाला नाही. सोलापूरच्या बाजारपेठेत सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू असल्याने राख्यांची विक्री अल्प प्रमाणात झाली. शाळा व महाविद्यालये देखील बंद असल्याने पालकांनी संसर्गाच्या भीतीने घरातच सुटी घालवली. त्यामुळे एकूणच या सणावरही कोरोनाचे सावट दिसले.
घरातच गोडधोड बनवून सकाळीच बहीण-भावांनी राखीचा सण साजरा केला. सेल्फि क्लिक करून सोशल मीडियावर अपलोड केले. काहींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक संस्था, संघटनांच्यावतीने सोमवारी कोव्हीड योद्धांना राखी बांधण्याचा उपक्रम ठेवण्यात आला होता. यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना राख्या बांधत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.