मुंबई : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसह राज्याच्या काही भागात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीची 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत पूरग्रस्तांच्या खात्यात उद्या शुक्रवारपासून (30 जुलै) जमा होणार आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. या नुकसानग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत होती. 4 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यासंदर्भात मदतीची घोषणा होण्याचीही शक्यता आहे.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी या मदतीसंदर्भातली माहिती दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, पूरग्रस्तांना तातडीनं मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. रोख रकमेचं वाटप केलं तर पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्यापासूनच पूरग्रस्तांच्या थेट खात्यात हे पैसे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तातडीनं पंचनामे करुन 8 दिवसात अहवाल देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. हा अहवाल केंद्राला पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत. या पावसामुळे 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचंही ते म्हणाले.
नांदेडमध्ये 80 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून तिथे एकाच दिवशी 166 मिलीमीटर पाऊस पडला. काही ठिकाणी तर 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयनाच्या परिसरात 48 तासात 1072 मिलीमीटर पाऊस झाला आणि 17 टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ढगफुटीपेक्षा हे भयानक आहे. निसर्गाचं बॅलन्स बिघडल्याची ही परिस्थिती आहे. म्हणून अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
* केंद्र सरकारने 700 कोटी रुपये दिले, पण ते गेल्यावर्षीचे
विजय वड्डेटीवार यांनी केंद्राकडून मिळालेल्या मदतीवरही भाष्य केलं. केंद्र सरकारने 700 कोटी रुपये दिले, पण ते गेल्यावर्षी आलेल्या ऑक्टोबरच्या पुराचे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. बघा पूर आला आणि पैसे दिले, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे. आम्ही 3 हजार 721 कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. आता त्यातले 700 कोटी मिळाले. तौक्ते, निसर्ग वादळ आलं, विदर्भात महापूर झाला त्याचीही अजून मदत मिळाली नाही. या सर्व संकटात 420 आणि 721 कोटी राज्याला मदत मिळाली आहे. म्हणजे राज्याला आतापर्यंत 1141 कोटी आतापर्यंत मिळाले आहेत. पुढचे पैसे मिळावेत ही अपेक्षा, असंही ते म्हणाले.