मुंबई : मिशन बिगीन अंतर्गत मुंबईत आता सरसकट दुकानं सुरु करण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली आहे. तसेच दारुच्या दुकानातही काऊंटरवर मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. नुकतंच याबाबतचे निर्देश पालिकेने जारी केले आहे. हे सर्व येत्या बुधवारपासून सुरु होणार आहे.
मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आदेशानुसार, मिशन बिगीन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकाने सकाळी 9 ते 7 पर्यंत सुरु ठेवली जाणार आहे. तसेच दारुची दुकानही सुरु केली जाणार आहे. त्यानुसार आता काऊंटरवर दारु मिळणार आहे. मात्र यादरम्यान सर्व गाईडलाईन्सचे पालन करणे गरजेचे असणार आहे. दरम्यान यापूर्वी एक दिवसाआड दुकाने सुरु करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र यात आता बदल करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
येत्या 5 ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करता येणार आहे. मात्र मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही. पण होम डिलीव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटला किचन सुरु ठेवता येणार आहे.
* काय सुरु, काय बंद
– सर्व अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार
– सर्व अत्यावश्यक सेवेत न मोडणारे दुकानं, मार्केट यांनी परवानगी देण्यात आली आहे. सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु राहतील.
– काऊंटरवरुन दारु विकण्यास परवानगी. याशिवाय दारुच्या होम डिलिव्हरीला परवानगी. मात्र, यासाठी सरकारने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करणं अनिवार्य. अन्यथा दुकान मालक किंवा संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होईल.
– 5 ऑगस्टपासून सर्व मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सुरु ठेण्यास परवानगी. पण मॉलमधील थिएटर आणि रेस्टॉरंट यांना यातून वगळण्यात आलं आहे. मॉलमधील थिएटर आणि खाद्य पदार्थांच्या स्टॉल किंवा रेस्टॉरंटला अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या किचनसाठी परवानगी देण्यात आली आहे. या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटला होम डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
– सर्व ई-कॉमर्स कामांना परवानगी
– सध्या सुरु असलेल्या सर्व कंपन्या सुरुच राहतील
– सर्व बांधकाम कामांना परवानगी