मोहोळ : सोलापूर-पुणे महामार्गावर दिवस – रात्र वाहनधारकांवर कारवाया करून महामार्ग पोलिसांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. सावळेश्वर आणि वरवडे टोल नाका येथे महामार्ग पोलिसांकडून चार चाकी वाहने अडवली जातात. २९ जुलै रोजी मोहोळ येथील एका वकिलाच्या बाबतीत असा प्रकार घडल्यामुळे महामार्ग पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे
मोहोळ येथील विधिज्ञ ॲड. कैलास नाईक यांच्याकडे चारचाकी आहे. त्यांची चारचाकी सध्या घरीच लावून आहे. मात्र २९ जुलै रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर सदर चारचाकीला दोनशे रुपये दंड केल्याबाबत चा मेसेज आला. त्यामुळे त्यांनी त्यांची चार चाकी घरीच आहे का नाही याची खात्री केली असता सदर चार चाकी घरासमोरच होती. त्यामुळे महामार्ग पोलिसांकडून असा दंड करण्याचा हेतू त्यांच्या लक्षात येईना. त्यामुळे त्यांनी त्यांचे लहान भाऊ पत्रकार भारत नाईक यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी केली असता, सोलापूर पुणे महामार्गावरील मोडनिंब येथे ही कारवाई करण्यात आल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे नाईक यांनी आमची गाडी घरीच आहे मग कारवाई कशी केली अशी विचारणा केली असता महामार्ग पोलिसांकडून कारवाईचे समर्थन करण्यात आले.
यासंदर्भात भारत नाईक यांनी ऑनलाइन कारवाई संदर्भात महामार्ग पोलिसांनी अपलोड केलेला फोटो पाहिला असता त्यांना धक्काच बसला. कारण महामार्ग पोलिसांकडून एम.एच.१३, बी.एन. ९०६५ या चार चाकी वाहनावर कारवाई करण्यात आली होती. तर नाईक यांच्या कारचा नंबर एम.एच.१३, बी.एन. ६०६५ असा आहे. त्यामुळे आशा किती चुकीच्या वाहनांवरती महामार्ग पोलिसांकडून कारवाया होत आहेत. काय चाललंय? वरिष्ठ पोलिस अधिकारी अशा चुकीचा कारवाया करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कधी लक्ष देणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.