माढा : माढा शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असून आज नवीन 7 रूग्णांची वाढ झाल्याने शहरात एकूण बाधितसंख्या 37 झाली आहे. आज केलेल्या 20 जणांच्या रॅपिड अॅटिजन टेस्ट मध्ये 7 रूग्ण बाधित आढळून आले असून संतसेनानगरमधील 1 स्त्री, भांगे गल्लीतील 2 पुरूष 1 स्त्री तर शिवाजीनगर भागातील 3 स्त्रियांचा समावेश आहे.
पंधरा दिवसापूर्वी निघालेल्या दोन पोलीस आणि इतर दोन कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पाॅझीटीव्ह आल्याने शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. माढा नगरपंचायतीच्या वतीने शहर लाॅकडाऊन केले. दरम्यान संपर्कातील सर्वजण निगेटिव्ह आले आणि बाधित चारही रूग्ण बरे झाल्याने शहर कोरोनामुक्त झाले. दरम्यान 29 जुलै रोजी शहरातील एका व्यापाऱ्यास लागण झाल्याने कोरोनामुक्त माढा शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. एक – एक करीत आज अखेर 37 रूग्ण झाले असून आतापर्यंत एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* माढ्यात सात दिवसाचा जनता कर्फ्यू
माढा शहरातील वाढत्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी उद्या मंगळवार 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट अखेर जनता कर्फ्यु पुकारण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा मिनलताई साठे यांनी दिली. आज सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा मिनलताई साठे, दादासाहेब साठे, मुख्याधिकारी चरण कोल्हे, सपोनि अतुल कादबाने, गुरुराज कानडे आदीसह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही दुकाने चालू राहणार नाहीत. मेडिकल हाॅस्पीटल नियमित, दुध सकाळी 7 ते 9 व रात्री 7 ते 9 आणि पाणी सकाळी 9 ते 12 या वेळेत चालू राहणार आहे.